बोरसे निघाला महाठग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

दानवेच नव्हे, मातब्बर राजकारण्यांच्या नावाने राज्यभर गंडा!

दानवेच नव्हे, मातब्बर राजकारण्यांच्या नावाने राज्यभर गंडा!
औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या नावाचा वापर करून अनेकांना गंडविणाऱ्या गणेश बोरसे याने केवळ दानवे यांच्याच नव्हे, तर अनेक नेत्यांच्या नावाने नऊ वर्षांपासून अनेकांची फसवणूक केली आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे राज्यात सरकार असताना त्याने अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली.

गणेश रावसाहेब बोरसे (वय 46, मूळ रा. करजगाव, ता. भोकरदन, जि. जालना, ह.मु. अंजली अपार्टमेंट, खडकेश्वर, औरंगाबाद) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी 19 मे रोजी अटक केली आहे. सुमारे नऊ वर्षांपासून त्याचा फसविण्याचा उद्योग सुरू असल्याचे तपासात समोर आले. विशेष म्हणजे दानवे यांच्याही आधी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना त्याने अनेक बड्या नेत्यांशी जवळीक साधली होती. राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या सभेच्या सर्व बाबी त्याने "मॅनेज' केल्या होत्या. मुंबईत बोरसेने अनेक अधिकाऱ्यांना मी दानवे यांचा भाऊ आहे, तुमच्या बदल्या करून देतो, असे सांगून पैसे उकळल्याचे प्रकरण समोर आले होते.

सत्ता आली की पलटला..
नऊ वर्षांपासून फसवणुकीचा "उद्योग' करणारा बोरसे ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाशी जवळीक साधत होता. बड्या नेत्यांशी, पुढाऱ्यांशी आपण जवळ आहोत, याचा आव तो आणत होता. जेव्हा भाजपची सत्ता आली, त्या वेळी दानवे यांच्यासारख्या नेत्यांचे तो पाय चेपू लागला.

टोपेंच्या नावानेही "टोप्या घातल्या'
तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या जवळचा असल्याचे सांगत त्याने काहींना गंडवले. आयएएस अधिकारी आपल्या ओळखीचे आहेत, मर्जीतले आहेत, असे सांगून गणेश बोरसेने अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदली करून देण्याचे आमिष दाखवून फसविल्याची बाब पोलिस आयुक्तांनी सांगितली.

बॅंक खाती गोठवली
गणेश बोरसेची दोन बॅंक खाती पोलिसांनी गोठवली; मात्र या खात्यांत फारशी रक्कम नव्हती. बोरसे राज्यभर फसवणूक करीत होता, त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेत्यांची बनावट कागदपत्रे सापडल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

आणखी दोघांना अटक
गणेश बोरसेचे साथीदार अजय ऊर्फ विक्की गवळी (वय 31, रा. बुलडाणा) व गणेश पवार (रा. कऱ्हाड, जि. सातारा) यांना पोलिसांनी त्यांच्या गावातून रविवारी (ता. 21) रात्री ताब्यात घेतले. त्यांना अटक झाली असून, चौकशी सुरू असल्याचे पोलिस आयुक्त म्हणाले.