मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियाची भीती!

social-media
social-media

औरंगाबाद - अलीकडच्या काळात मने संकुचित झाली आहेत. स्पष्टपणे बोलण्याची सोय राहिली नाही. अनेकवेळा लोक म्हणतात, भाषणे रंगत नाहीत. रंगतील कसे? काहीही अर्थ काढले जात असल्याने भाषणामध्ये विनोददेखील होत नाहीत. तेवढाच विनोदाचा भाग काढून त्यावर कोण किती दिवस भंडावून सोडेल याचा भरवसा राहिलेला नाही, अशा शब्दांत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाबद्दलची भीती व्यक्‍त केली.

चरित्रग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सोशल मीडियाबद्दल भीती व्यक्‍त केली. ते म्हणाले, की पूर्वी बिनधास्त, स्पष्टपणे बोलले जायचे. त्याबद्दल कुणीही वाईट वाटून घेत नव्हते. सकारात्मकतेने त्याचा स्वीकार व्हायचा. आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता दिसला नेता की मोबाईलवर फोटो, शूटिंग केली जाते. कोण कशाच्या ताटात जेवतेय, काय खातेय, कुणासोबत खातेय, हे लगेच लोकांपर्यंत पोचविले जाते. त्यानंतर मग जोरदार टिप्पणी सुरू होते. अनेक दिवस त्यावर चर्वितचर्वण केले जाते. सोशल मीडिया यात पुढे आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनीही सोशल मीडियाबद्दल भीती व्यक्त केल्याने याची उपस्थितांमध्ये जाेरदार चर्चा रंगली होती.

मानसिंग पवारांना काँग्रेससह भाजपकडूनही ऑफर
माजी खासदार (कै.) बाळासाहेब पवार यांच्या आयुष्यावरील चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यातच श्री. विखे पाटील व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बाळासाहेब पवार यांचे पुत्र उद्योजक मानसिंग पवार यांना राजकारणात येण्याची ‘ऑफर’ देऊन टाकली! 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेदेखील कार्यक्रमासाठी निमंत्रित होते; पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. मानसिंग पवार यांच्या आग्रहाखातर त्यांच्या जागी श्री. विखे पाटील यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. जुन्या आठवणींना उजाळा देत असतानाच श्री. विखे यांनी मानसिंग पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. दोन दिवसांपूर्वी मला कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. महाविद्यालयीन दशेपासून मानसिंग आणि मी मित्र आहोत. त्यामुळे त्यांचे मला ऐकावेच लागले. आता त्यांनीदेखील माझे ऐकावे आणि राजकारणात यावे, अशी गळ त्यांनी घातली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. 

संवाद, नजरानजर होताच हशा पिकला
राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, की बाळासाहेब पवार हे आव्हान देऊन बंड करायचे. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची झोप उडायची. हा इतिहास आहे. चांगल्या अर्थाने सांगतो, असे म्हणत जर आज बाळासाहेब असते तर...? आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेला नजर दिली. हा संवाद आणि नजरानजर पाहून उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

भोगले देतील योग्य सल्ला
श्री. बागडे यांनीदेखील आपल्या भाषणात विखे यांच्या भाषणाचा धागा पकडत मानसिंग यांच्याकडे सर्वांच्या नजरा असल्याचा उल्लेख केला. राम भोगले, मानसिंग दोघेही उद्योजक आणि चांगले मित्रदेखील आहेत. त्यामुळे राजकारणात त्यांनी कोणत्या पक्षात जावे, याचा योग्य सल्ला श्री. भोगले देतील, असा चिमटाही त्यांनी काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com