मुख्यमंत्री घेणार बुधवारी औरंगाबादेत आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

औरंगाबाद - मराठवाड्यात राबविण्यात येत असलेल्या विविध सरकारी खात्यांच्या योजना आणि विकासकामांचा आढावा घेण्यासोबतच खरीप हंगामाच्या तयारीसाठी येत्या बुधवारी (ता. 12) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे औरंगाबादेत बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी मराठवाड्यातील सर्व पालकमंत्र्यांनाही बोलाविण्यात आले असून, सरकारी खात्यांचे अधिकारीही उपस्थित राहतील. जलयुक्‍त शिवार, मागेल त्याला शेततळे, कृषीपंप वीज जोडणी, पीककर्ज वाटप आणि खरीप हंगामपूर्व नियोजन, ई-फेरफार यांसह विविध सरकारी योजनांचा मराठवाड्यातील नागरिकांना, शेतकऱ्यांना काय फायदा झाला, या योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने सुरू आहे, त्यातील अडचणी काय आहेत, मराठवाड्यासाठी जाहीर झालेल्या विकासकामांची सद्यःस्थिती काय आहे, यांसारख्या विविध विषयांचा आढावा या वेळी घेण्यात येणार आहे.

गेल्या वर्षअखेरीस मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सहाही विभागांतील सरकारी योजनांचा आढावा घेण्याचे नियोजन केले होते. काही कारणास्तव मराठवाड्यात ही आढावा बैठक झाली नाही. त्यामुळे तेव्हाची ही बैठक आता बुधवारी होत आहे.

Web Title: chief minister meeting in aurangabad