व्हॉट्‌स ऍपच्या पोस्टने रोखला बालविवाह!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

औरंगाबाद - सोशल माध्यमाच्या सकारात्मक वापराने अनेक प्रश्‍न सुरळीतपणे सोडविता येतात, याचाच प्रत्यय आज शहरात आला. व्हॉट्‌स ऍपवर फिरणाऱ्या एका पोस्टमुळे शहरात बालविवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही पक्षांची समजूत काढून बालविवाह रोखला.

औरंगाबाद - सोशल माध्यमाच्या सकारात्मक वापराने अनेक प्रश्‍न सुरळीतपणे सोडविता येतात, याचाच प्रत्यय आज शहरात आला. व्हॉट्‌स ऍपवर फिरणाऱ्या एका पोस्टमुळे शहरात बालविवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही पक्षांची समजूत काढून बालविवाह रोखला.

शहरातील सिडको भागात राहत असलेले हे कुटुंब अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. पालकांचेही कुटुंबाकडे फारसे लक्ष नाही. पण मुलगी तर वयात येत होती. हे पाहून नातेवाइकांनी मुलीचे लग्न करण्याचे ठरवले.

स्थळ पाहिले, मुला-मुलींची घरी भेट घडवली. मुलाला मुलगी पसंत पडली. मुलगाही नातेवाइकांना पसंत पडला. मग साध्या पद्धतीने लग्न लावून देण्याचे मुलीकडील मंडळींना सांगत सुपारी फुटली आणि तारीखही निश्‍चित झाली. अर्थात शुक्रवारी (ता. पाच) सकाळी अकराला सिडको भागातच लग्नही होणार होते. पण मुलगी सतरा वर्षे दहा महिन्यांचीच असल्याची बाब समोर आली आणि बालविवाह होऊ नये, असे वाटणाऱ्याने एक पोस्ट तयार केली. त्यानंतर ही पोस्ट विविध ग्रुपवर फिरवली. पाहता पाहता हा संदेश सर्वत्र पसरला. औरंगाबादेतील पोलिसांच्या ग्रुपवरही पोस्ट पोचली. त्यानंतर लगेचच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली. तेथे विवाहाची तयारी सुरूच होती, लग्न लावणाराही पोचलाच होता, पण पोलिस पाहून त्यांना शंका आली आणि ते माघारी फिरले.

पालकांचे समुपदेशन
घटनास्थळी सिडको पोलिस पोचले. त्यांनी मुलीचे पालक व अन्य नातेवाइकांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम व कायद्याचे उल्लंघन या बाबी समजावल्या. विशेषत: त्यांचे समुपदेशन केल्यानंतर पालक व नातेवाइकांनी सहमती दर्शविली.

आता तीन महिन्यानंतरची तारीख
अठरा वर्षांच्या आतील मुलीचा विवाह करणे कायद्याने गुन्हा असून अशा प्रकरणात बालविवाहविरोधी कायद्यानुसार कारवाई होते. ही बाब लक्षात घेऊन नातेवाइकांनी मुलीचे लग्न पुढे ढकलून तीन महिन्यानंतरची तारीख काढली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अशी होती पोस्ट...
ऍलर्ट फॉर पोलिस. औरंगाबाद येथे एका पंधरा वर्षीय मुलीचे जबरदस्ती लग्न लावून देण्याचा प्रयत्न तिच्या घरच्यांकडून करण्यात येत आहे. मुलीला लग्न करायचे नाही. शुक्रवारी अकराच्या सुमारास लग्न आहे. आपल्याकडून काही होत असेल तर प्रयत्न करा. तसेच लग्नस्थळाचा पत्ताही पोस्टमध्ये नमूद होता.