एटीएमसमोर नागरिकांच्या रांगा

एटीएमसमोर नागरिकांच्या रांगा

औरंगाबाद - काळ्या पैशांचा नायनाट करण्यासाठी पाचशे, हजारच्या नोटा बंद करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. आठ) रात्री सव्वाआठच्या सुमारास भाषणाच्या माध्यमातून केली. ही बातमी व्यापाऱ्यांमध्ये आगीसारखी पसरली. त्यानंतर लगेचच बाजारात ग्राहकांकडून पाचशे-हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला. हजार-पाचशेच्या नोटा खिशात असतानादेखील बाजारात हाहाकार निर्माण झाला. 

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद करण्याची घोषणा झाल्याबरोबर व्यापाऱ्यांमध्ये सोशल साइटवरून लगेचच या निर्णयाच्या पोस्ट फिरल्या. अचानक हा निर्णय व्यापारी आणि ग्राहकांपर्यंत धडकल्याने बहुतांश हॉटेल, पेट्रोलपंप आणि मेडिकल बंद करण्यात आले. त्यामुळे ग्राहक व व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा थेट एटीएम किंवा घराकडे वळवला. 
 

"चारशे-चारशे'चे व्यवहार 
बुधवारी बॅंक, तर दोन दिवस एटीएम बंद असल्याने रात्री नऊपासून रात्री बारापर्यंत गर्दीच गर्दी झाली होती. अचानक निर्णय झाल्याने बॅंकांमध्ये शंभर, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा मशिनमध्ये उपलब्ध होत्या; मग यातून शंभरच्या नोटा काढण्यासाठी खातेधारकांना चारशे-चारशे रुपयांनी शंभरच्या नोटा मिळविताना मोठी कसरत करावी लागली. दुसरीकडे आपल्याकडे असलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा मशिनमध्ये डिपॉझिट करण्यासाठी ठिकठिकाणी रांगा लागल्या होत्या. मात्र, बहुतांश एटीएमच्या व्यवहारांवर आलेल्या ताणामुळे आऊट ऑफ सर्व्हिसचे बोर्ड झळकले होते. 
 

इन्कम डिक्‍लेरेशन स्कीम 
भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत "इन्कम डिक्‍लेरेशन स्कीम' राबविण्यात आली होती. या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दीड महिन्याने लगेचच काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाजारातून हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा. त्यामुळे ज्यांनी या योजनेचा फायदा घेतला, ते फायद्यातच राहिले, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. 

""पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. सचोटीने वागणाऱ्या लोकांमध्ये आशा निर्माण झालेली आहे. सर्व भ्रष्टाचारी लोकांनी जमवून ठेवलेल्या लोकांच्या संपत्तीवर आळा बसेल. यापूर्वी आयडीएस योजनेत हा पैसा जमा केला असता, तर पैसे वाचले असते. आता या पैशाचा स्रोत आता द्यावा लागेल. सर्वसामान्य लोकांमध्ये केंद्र सरकारबद्दल चांगला संदेश जाईल.'' 

- रामचंद्र भोगले, अध्यक्ष, मराठवाडा ऑटो क्‍लस्टर 
 

""व्यापारी आणि नागरिकांमध्ये नोटा बंद केल्याबद्दल नियम, उपनियमांमध्ये संभ्रम आहे. जोपर्यंत नियमांबद्दल माहिती कळत नाही. तोपर्यंत सर्वांनाच भीती वाटते. उद्या नियम कळल्यानंतर हे वातावरण निवळून जाईल. या निर्णयाबद्दल कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. व्यवस्थेला समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही शासनाला जरूर मदत करू.'' 

- अजय शहा, अध्यक्ष, व्यापारी महासंघ 

""काळा पैसा उघड करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना केली. या निर्णयाचे स्वागतच आहे. बॅंकांना हा निर्णय अमलात आणण्यासाठी पूर्वतयारी नसल्यास गोंधळ उडू शकतो. एक दिवसाच्या सुटीनंतर बॅंका खुल्या होतील तेव्हा पाचशेच्या नोटा ग्राहक जमा करतील. अशा वेळी शंभरच्या नोटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. दुसरीकडे प्लास्टिक मनीचा वापर वाढण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्‍यकता आहे. हा निर्णय अमलात आणणे मोठे आव्हानात्मक ठरणार आहे.'' 

- देविदास तुळजापूरकर, अध्यक्ष, बॅंकिंग एज्युकेशन ट्रेनिंग अँड रीसर्च ऍकॅडमी. 

""पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय योग्य आहे. भ्रष्टाचारमुक्‍त भारत घडविण्याच्या दृष्टीने हे प्रगत पाऊल मानायला हवे. प्लास्टिक मनीचा वापर वाढल्यास सर्व व्यवहार पारदर्शक होतील. त्यामुळे आपोआपच अर्थव्यवस्था सुधारेल. दुसरीकडे पैशाच्या बळावर होत असलेला दहशतवाददेखील कमी होण्यास मदत होईल.'' 
- गुरप्रीतसिंग बग्गा, अध्यक्ष, सीएमआयए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com