येथे चालक-वाहकालाच स्वच्छ करावी लागते बस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

येथील बसआगारात चालक-वाहकालाच बस स्वच्छ करावी लागत आहे. दिवसभराच्या प्रवासाने थकणाऱ्या चालक-वाहकाला आरामाची गरज असताना बस धुण्याचे अतिरिक्त काम करावे लागत आहे.

गंगापूर - येथील बसआगारात चालक-वाहकालाच बस स्वच्छ करावी लागत आहे. दिवसभराच्या प्रवासाने थकणाऱ्या चालक-वाहकाला आरामाची गरज असताना बस धुण्याचे अतिरिक्त काम करावे लागत आहे.

आगारप्रमुखांचे स्वच्छता कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने "कोणाच्या खांद्यावर कोणाचे हे ओझे' या गाण्याचा प्रत्यय येथील आगारात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छतेचा आग्रह धरला आहे. स्वच्छतेची प्रत्येक वेळी आठवण राहावी, यासाठी केंद्र शासनाने 2000 व 500 रुपयांच्या नवीन नोटांवर स्वच्छ भारतचा लोगोही वापरण्यात आला आहे; मात्र कामाची जबाबदारी व ते काम करून घेण्यासाठी सक्षम अधिकारीवर्ग नसल्याने एकाचे काम एकाला करावे लागत आहे. बहुजन हिताय-बहुजन सुखायचे ब्रीद असलेल्या एसटीला खरे तर पर्याय नाही, असे समजून गोरगरीब, असंख्य विद्यार्थी या सेवेचा लाभ घेतात. सर्व प्रवाशांनी खरे तर बस स्वच्छ ठेवायला हवी. प्रत्यक्षात पाऊचमध्ये मिळणारे पदार्थ बसमध्ये खाऊन, तेथेच ते पाऊच टाकले जातात. काही प्रवाशांना बस सहन होत नाही, असे म्हणतात. ते बसमध्येच उलटी करतात. प्रवासी ठरलेल्या थांब्यावर उतरून जातात. बसवाहक, चालकाला मात्र अशा घाणीतच प्रवास करावा लागतो. आपली बस स्वच्छ असली पाहिजे अशी अनेकांची भावना असते. पण बस धुणार कोण, हा खरा प्रश्‍न आहे. स्वच्छता कर्मचारी असूनही त्यांच्यावर आगारप्रमुखांचे नियंत्रण नाही. त्यामुळे बस धुतल्या जात नाहीत. अशावेळी नाइलाजाने चालक-वाहकालाच स्वतः पुढाकार घेऊन बस धुवावी लागते. एसटी कर्मचाऱ्यांच्या या रोषाचा भडका उडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

स्वच्छ भारत अभियानाला खो
येथील आगारात प्रवाशांसाठी शौचालय असून शौचालयात नाक दाबूनसुध्दा जाणे अशक्‍य आहे. यावर पर्याय म्हणून पुरुष उघड्यावर मूत्रविसर्जन करतात तर स्त्रियाची कुचंबणा होते. शौचालयांमध्ये असलेली घाणही स्वच्छ होत नसल्याने पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला खो बसत आहे.

कमलेश भारती (आगारप्रमुख) : चालक-वाहक स्वतःच्या आवडीनेच बस स्वच्छ करतात. आमच्याकडे कर्मचारी आहेत. मात्र, कधी कधी सुटीवर असतात. तेव्हा बसचालकाला काम करावे लागते. बसचालकही आपल्या आवडीने बस धुतात. आपली बस स्वच्छ असावी असा त्यांचा हेतू असतो.

Web Title: Cleanliness issue : Driver-Conductor cleans bus