बॅंकांसह एटीएम बंद; जालनेकर त्रस्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

जालना -  काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र एटीएममध्ये पुरेशा नोटा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. सोमवारी (ता.14) गुरुनानक जयंतीनिमित्त बॅंकांना सुटी तर बहुतांश एटीएममध्ये रक्कमच नसल्याने नागरिकांची अडचण झाली. 

मागील पाच दिवसांपासून दिवसभर रांगेत उभे राहून सर्वसामान्य नागरिक दोन हजार रुपये मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे ज्यांचे बॅंकेत खाते नाही, अशा नागरिकांना मात्र पाचशे, हजारांच्या नोटा जवळ असतानाही काही खरेदी करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. बॅंकांना असलेल्या सुटीची दक्षता घेऊन एटीएम मशिनमध्ये कमीत कमी रकमेचा पुरवठा करायला हवा होता, असा सूर दिवसभर शहरात उमटला होता. 

राष्ट्रीयीकृत बॅंकांचे एटीएम बंदच 
मागील दोन-तीन दिवसांपासून स्टेट बॅंक ऑफ इंडिया, हैद्राबाद बॅंक, बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांचे एटीएम जवळपास बंद अवस्थेत दिसून आले. दुसरीकडे खासगी बॅंकांचे एटीएममधून काही प्रमाणावर रक्कम ग्राहकांना मिळत आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांच्या एटीएममधून रक्कम का मिळत नाही, असा सवाल सर्वसामान्य उपस्थित करत आहेत. 

दिवसभर रांगेत उभे राहूनही पैसे मिळतील की नाही याची शाश्‍वती नाही. दुसरीकडे दैनंदिन घरखर्चासाठी सुटे पैसे लागत असल्याने आणावे कुठून असा प्रश्‍न पडत आहे. ज्यांच्याकडे एटीएम कार्ड आहे असे नागरिकांना काही वेळात पैसे मिळत आहेत मात्र आमच्याकडे कार्ड नसल्याने आम्हाला बॅंकेच्या रांगेत उभे राहिल्याशिवाय पर्याय नाही. 
- विलास भुतेकर, नाव्हा