चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांच्या 5 सभा

ashok-chavan
ashok-chavan

नांदेड : राज्यात पहिल्या टप्यात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपने आघाडी घेतल्यानंतर आता दुसऱ्या टप्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी तब्बल पाच सभा घेतल्या. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात फडवणीस यांनी घेतलेल्या सभांच्या धडाक्‍यामुळे प्रचाराचा चांगलाच धुराळा उडाला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याचा सात - बारा कुणाचा ? यावर चर्चा सुरु झाली आहे. 

नांदेड विधान परिषदेची निवडणुक नुकतीच झाली. त्यावेळी नांदेडला फडवणीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नांदेडचा सात बारा कुण्या एका व्यक्तीच्या नावे नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता केली होती. नांदेड विधानपरिषदेच्या निवडणुकीत अमर राजूरकर निवडून आल्यानंतर श्री. चव्हाण यांनी नांदेडचा सात बारा जनतेचा असून तो कुणाच्या नावावर झाला हे कळाले असेलच असे सांगून भोकरदनचा सात बाराही कॉंग्रेसच्या नावावर असल्याचे उत्तर दिले होते. 
नांदेड जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुका येत्या 18 डिसेंबरला आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर फडवणीस यांच्या हदगाव, धर्माबाद, कुंडलवाडी, देगलूर आणि मुखेड येथे पाच सभा झाल्या. या सभांमधून श्री. फडवणीस यांनी नोटाबंदीचे समर्थन करत भ्रष्टाचार व गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर देशात आणि राज्यात बदल झाला असून या मंथनातून विकासरुपी अमृत तयार होत असून मतदारांनी देखील हा बदल आपल्या शहरात घडवून आणावा असे आवाहन केले. 

एकीकडे मुख्यमंत्री फडवणीस यांच्या सभांचा झंझावात सुरु असतानाच दुसरीकडे चव्हाण यांनी देखील सभांचा धडाका सुरु केला आहे. त्यांनी देखील गेल्या चार दिवसात वार्ड आणि प्रभाग पिंजून काढून मतदारांना अच्छे दिन आले का? असा प्रश्न विचारला आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षावर टीका करत असतानाच कॉंग्रेस पक्षाने केलेल्या कामाची माहिती देत आहेत. 

तिसरीकडे शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील आमदार प्रताप पाटील चिखलीकर (कंधार), हेमंत पाटील (अर्धापूर, मुदखेड), नागेश पाटील आष्टीकर (हदगाव) आणि सुभाष साबणे (देगलूर, मुखेड, बिलोली) हे चौघेजण आपआपल्या नगरपालिकांच्या प्रचारात तळ ठोकून आहेत. भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड मुखेडला तर राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक माहूरला त्याचबरोबर कॉंग्रेसचे आमदार वसंत चव्हाण धर्माबाद, उमरीला तर डी. पी. सावंत आणि अमिता चव्हाण अर्धापूर, मुदखेडकडे प्रचारात व्यस्त झाले आहेत. राजूरकर देखील जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीमध्ये जास्तीत जास्त कॉंग्रेसचे सदस्य निवडून येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर विविध पक्षांचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील आपआपल्या परीने आपला गड शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

जिल्ह्यातील या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या चार पक्षांसह एमआयएम, भारिप बहुजन महासंघ, मनसे, बसपा या पक्षांसह अपक्षही रिंगणात आहेत. नांदेड जिल्ह्याचा सात बारा कुणाचा होणार? याकडे आता मतदारांचे लक्ष लागले असून प्रचाराच्या या रणधुमाळीचा निकाल येत्या 19 डिसेंबरला दुपारपर्यंत लागणार आहे. त्यामध्ये कोण बाजी मारणार? कुणाच्या पारड्यात नांदेडकर जनता मते टाकणार, याचा निकाल लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com