नोटाबंदी विरोधात कॉंग्रेसचा पुन्हा संघर्षाचा पवित्रा 

नोटाबंदी विरोधात कॉंग्रेसचा पुन्हा संघर्षाचा पवित्रा 

औरंगाबाद : पंतप्रधान मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरून मोर्चे काढण्याचा प्रयोग फसल्यानंतर कॉंग्रेस याच मुद्यावरुन पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. राज्यातील 10 महापालिका 26 जिल्हापरिषदा आणि 297 पंचायत समिती निवडणुका हे यामागचे खरे कारण आहे. "पचास दिन' दिल्यानंतरही सामान्य माणसाला दिलासा मिळाला नसल्याचा आरोप करत कॉंग्रेस नव्याने जनतेचा या मुद्यावर कानोसा घेणार आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कॉंग्रेसच्या नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची माहिती देण्यास सांगितले होते. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे औरंगाबादची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. औरंगाबादेत 7 जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाची तयारी वेगाने सुरू आहे. 

कॉंग्रेसच्या वतीने राज्यात 6 जानेवारी रोजी तर औरंगाबादेत मुस्लिम मोर्चामुळे 7 रोजी हे आंदोलन होत आहे. मात्र आंदोलनाचे स्वरूप कसे असेल याबाबत कॉंग्रेसमध्येच संभ्रम असल्याचे थोरात यांच्या बोलण्यावरून जाणवले. आंदोलनाची माहिती देण्यासाठी गाजावाजा करत पत्रकार परिषद बोलविली खरी पण केवळ प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने इथे आलो, आंदोलनाची तारीख व स्वरूप तुम्हाला जिल्हाध्यक्ष नामदेव पवार हे नंतर कळवतील असे थोरात यांनी पत्रकारांना सांगितले. हे सांगण्यासाठीच पत्रकारपरिषदेचे प्रयोजन होते का? असा प्रश्‍न उपस्थितांना पडला. या आधीचा मोर्चा फसल्यानंतर पुन्हा आंदोलन कसे? यावर देखील आमची भावना लक्षात घ्या असे मोघम उत्तर थोरात यांनी दिले. 

नोटाबंदीचा निर्णय फसला, पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी, ग्रामीण भागात कॅशलेस कसे करणार, जिल्हा बॅंकेतील कोट्यवधी रुपयांवरील व्याजाचे काय? असे प्रश्‍न व आरोप करत थोरातांनी आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. 

शक्ती प्रदर्शनाची संधी 
अंतर्गत गटबाजी, राजीनामानाट्य, नगरपालिका निवडणुकीतील अपयश आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नोटाबंदी विरोधातील आंदोलनाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी कॉंग्रेसने सुरू केली आहे. दीड महिन्यापूर्वी शहरातील मोर्चा फसल्यानंतर आता आंदोलन यशस्वी करण्यासाठी नव्यानेच जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार आलेल्या नामदेव पवार यांनी तन, मन, धनाने जोर लावला आहे. 31 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी केल्याला भाषणात काळा पैसा किती उघडकीस आला, भ्रष्टाचाराला लगाम बसला का? या मुद्यांना बगल देण्यात आली. यावरून मोदींना लक्ष्य करण्याची आणि जनतेतील नाराजी "कॅश' करण्याचा हा प्रयोग यशस्वी झाला तरच जिल्हा परिषदेचा मार्ग कॉंग्रेससाठी सुकर होणार आहे. 

प्रदेशाध्यक्षांना विचारण्याचा सल्ला 
औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सत्तार यांनी दिलेला राजीनामा आणि त्यावर कॉंग्रेसने शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्याकडे सोपवलेला कार्यभार या विषयावर थोरात यांना बोलते करण्याचा प्रयत्न यावेळी झाला. पण वादावर काही बोलायचे नाही अशी सक्त ताकीद वरिष्ठांकडून मिळाल्यामुळे या विषयावर शेवटपर्यंत थोरात यांनी "मी काही बोलणार नाही' चे पालुपद सुरू ठेवले. सत्तारांविषयी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाच विचारा असे म्हणत त्यांनी या वादात सहभागी होणे टाळले. जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेस जोरदार कामगिरी करणार असा दावा करताना सत्तारांच्या राजीनाम्याने कॉंग्रेसला काहीच फरक पडला नाही असे दाखवण्याचा प्रयत्नही थोरात यांनी यावेळी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com