तुळजापूरला कंत्राटदाराला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

तुळजापूर - नगरपालिकेच्या यात्रा अनुदान अपहारप्रकरणी पोलिसांनी बुधवारी (ता. पाच) एकाला अटक केली; तर अन्य तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले.

तुळजापूर - नगरपालिकेच्या यात्रा अनुदान अपहारप्रकरणी पोलिसांनी बुधवारी (ता. पाच) एकाला अटक केली; तर अन्य तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले.

तुळजाभवानी मातेच्या यात्रा अनुदानासाठी मिळालेल्या एक कोटी 62 लाख रुपयांचा रकमेचा अपहार झाल्याची तक्रार राजाभाऊ माने यांनी दिली होती. त्यानुसार 28 मार्च रोजी तुळजापूर पोलिस ठाण्यात नगराध्यक्ष अर्चना गंगणे, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे, लेखापाल अविनाश राऊत यांच्यासह तत्कालीन नगरसेवकासह दहा कंत्राटदारांवर गुन्हा दाखल झाला आहे; परंतु गेल्या आठ दिवसांपासून या प्रकरणात एकालाही अटक करण्यात आली नाही. अटकेसाठी पोलिसांची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, बुधवारी पोलिसांनी या प्रकरणी येथील कंत्राटदार ईश्वर जाधव यांना अटक केली; तसेच आणखी तीन जणांचे जबाब नोंदविले आहेत.

तुळजापूर पालिकेला 2011-2012 या वर्षात दीड कोटी रुपये यात्रा अनुदान प्राप्त झाले होते. बनावट शिक्के, बनावट लेटरहेड, बनावट स्वाक्षऱ्या, बनावट निविदा तयार करून एक कोटी 62 लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार श्री. माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत या तक्रारीनुसार चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवाल दिल्यानंतरही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास गेल्या चार वर्षांपासून टाळाटाळ सुरू होती. दरम्यान, या प्रकरणाचा श्री. माने यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर 28 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यापासून या प्रकरणातील संशयित आरोपी फरारी आहेत. सहायक पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन अधिक तपास करीत आहेत.