"स्वाराती'चा रविवारी दीक्षांत समारंभ 

"स्वाराती'चा रविवारी दीक्षांत समारंभ 

नवीन नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 19 वा दीक्षांत समारंभ रविवारी (ता. 26) सकाळी अकराला होणार आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत मंचावर हा कार्यक्रम होणार असून कुलपती आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव अध्यक्षस्थानी असतील. माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे असतील. कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी सोमवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

दीक्षांत समारंभात 242 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात येणार असून 11 हजार 812 विद्यार्थ्यांना पदवी-पदविकांचे वितरण होईल. त्यात विज्ञान शाखेच्या तीन हजार 556, कला शाखेच्या दोन हजार 895, वाणिज्य शाखेच्या दोन हजार 725, औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या 185, विधी शाखेच्या 451, शिक्षण शाखेच्या 69, शारीरिक शिक्षण शाखेच्या सहा, व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या 166, अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र शाखेच्या एक हजार 184, सामाजिकशास्त्र शाखेच्या 238, ललित कला शाखेच्या दोन, दूरशिक्षण शाखेच्या 52 आणि एमफिल पदवीच्या 41 विद्यार्थ्यांचा समावेश असेल. गत वर्षापर्यंत एकूण 30 सुवर्णपदकांस प्रायोजकत्व मिळाले होते. यावर्षी 41 प्रायोजक मिळाल्यामुळे 41 सुवर्णपदकांचे वितरण होईल. 

दीक्षांत समारंभास उपस्थित राहून पदवी, पदविका घेण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सकाळी साडेआठला विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील वेगवेगळ्या कक्षांतील एकूण 21 खिडक्‍यांवरून पदवी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी भरलेल्या अर्ज, शुल्काची मूळ पावती सादर करणे आवश्‍यक आहे. पीएच.डी.साठी अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभाच्या दिवशीच दुपारच्या सत्रात कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सर्व विद्याशाखेचे समन्वयक आणि विद्या परिषद सदस्यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. 

समारंभाच्या यशस्वितेसाठी कुलसचिव भगवंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय तसेच अन्य समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव भगवंतराव पाटील, डॉ. दीपक पानसकर, डॉ. रवी सरोदे, जनसंपर्क अधिकारी अशोक कदम आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com