नाल्यात कचरा टाकाल तर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

औरंगाबाद - स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशातील 434 शहरांमधून औरंगाबाद महापालिकेचा तब्बल 299 वा क्रमांक लागल्याने तातडीने शनिवारी (ता. सहा) बैठक घेण्यात आली. यावेळी स्वच्छतेच्या स्पर्धेत कमी गुण मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्‍त करून वॉर्ड अधिकाऱ्यांची खरडपट्टी करण्यात आली.

औरंगाबाद - स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशातील 434 शहरांमधून औरंगाबाद महापालिकेचा तब्बल 299 वा क्रमांक लागल्याने तातडीने शनिवारी (ता. सहा) बैठक घेण्यात आली. यावेळी स्वच्छतेच्या स्पर्धेत कमी गुण मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्‍त करून वॉर्ड अधिकाऱ्यांची खरडपट्टी करण्यात आली.

आगामी पंधरा दिवसाचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला असून, जे स्वच्छता निरीक्षक कामात कुचराई करतील त्यांना निलंबित करण्याचा इशारा देण्यात आला, तसेच नाल्यात कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दंड आकारून गुन्हे दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात केंद्रीय पथकाने शहराची पाहणी केली होती. त्यात महापालिकेला 299 वा क्रमांक मिळाला. त्यामुळे शनिवारी (ता. सहा) महापौर भगवान घडामोडे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात घनकचरा विभाग व वॉर्ड अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. पर्यटनाची राजधानी असलेले शहर स्वच्छतेच्या बाबतीत मागे का पडले, याविषयी शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी शुक्रवारी (ता.पाच) शिवसेनेच्या स्थायी समिती सदस्यांची बैठक घेतली होती. शहराच्या स्वच्छतेसाठी आपण कुठे कमी पडलो आहोत आणि त्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची सूचना केली. यावरून शिवसेनेच्या सहा स्थायी सदस्यांनी महापौरांना विशेष सभा आयोजित करण्याचे विनंतीपत्रही दिले. विशेष सभेऐवजी दुपारी बारा वाजता महापौर दालनात ही बैठक सुरू झाली. बैठकीला महापौरांसह उपमहापौर स्मिता घोगरे, गटनेते गजानन बारवाल, विरोधी पक्षनेता अयुब जागीरदार, गटनेता नासेर सिद्दीकी, आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपायुक्त विक्रम मांडुरके यांच्यासह वॉर्ड अधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्राकडून प्राप्त झालेला निकालाचा अहवाल श्री. मांडुरके यांनी सादर केला. या अहवालानुसार कचरा संकलन, व्यावसायिक भागातील कचरा नियोजन, कचरा वाहतूक व प्रक्रिया, स्वच्छतेच्या कामात नागरिकांचा सहभाग आणि विशेष म्हणजे स्वच्छता ऍपशी नागरिकांना जोडणे या प्रमुख पाच गोष्टींत महापालिका कमी पडल्याचे त्यातून समोर आले.

स्वच्छता आढावा बैठक चांगलीच गाजली
वॉर्ड अधिकाऱ्यांची खरडपट्टी
पंधरा दिवसांचा कृती कार्यक्रम तयार
सफाईनंतर घेणार आयुक्‍त, महापौर आढावा
नारेगावच्या कचरा डेपोची जागा होणार प्रक्रियेद्वारे रिकामी