नोटबंदीचा मोठा फटका मालवाहतुकीला

नोटबंदीचा मोठा फटका मालवाहतुकीला

औरंगाबाद - केंद्र शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर परिवहन क्षेत्रात सर्वाधिक फटका मालवाहतूकदरांना बसला आहे. जवळपास तीस ते पन्नास टक्‍क्‍यांनी व्यावसाय घटल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ प्रवासी वाहतुकीवरही तीस टक्के परिणाम झाला आहे. असे असले तरीही परिवहन विभागाची वसुली मात्र दुप्पट झाली आहे. परिवहन विभागाने ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

केंद्र शासनाने मंगळवारी (ता. आठ) अचानक नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे विविध व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. परिवहन (ट्रान्स्पोर्ट) क्षेत्राला मोठा तोटा सहन करावा लागत असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने या क्षेत्रातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. या निर्णयाने आंतरराज्यीय मालवाहतुकीत (लांब पल्ल्याची) 8 ते 10 नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये तब्बल 80 टक्के परिणाम झाला होता. आजही आंतरराज्यीय मालवाहतूक ही जवळपास पन्नास टक्के ठप्प झालेली आहे. त्याचप्रमाणे माल बुकिंगमध्ये जवळपास तीस ते पन्नास टक्‍के घट झाली. शहराअंतर्गत बाहेरील मालावाहतूकदारांची आवक-जावक तीस टक्‍क्‍यांनी घटली आहे. शहराअंतर्गत चालणाऱ्या किरकोळ मालवाहतुकीत मात्र नगण्य म्हणजे पाच टक्के घट झाली आहे.

एस.टी. महामंडळाकडून नियमितपणे होणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर जवळपास अकरा टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. तर ट्रॅव्हल्सद्वारे राज्याअंतर्गत होणाऱ्या प्रवासी संख्येत तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. याशिवाय विशेष परमिट घेऊन सहलीसाठी जाणाऱ्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे 90 टक्के परिणाम झाला आहे. शहरातील स्थानिक व्यावसायिक वाहतुकीत पाच ते दहा टक्के घट झाली आहे.

वाहनांची संख्याही घटली. अचानक आलेल्या नोटबंदीच्या संकटाने वाहने खरेदी करण्यासाठी लागणारे डाऊन पेमेंट भरण्यासाठी लोकांकडे रोख रक्कम नसल्याने आणि जुन्या नोटा बंद झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीवरही परिणाम झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये नव्या वाहनांच्या नोंदणीसाठी लागणाऱ्या रांगा घटल्या आहेत.

परिवहन कार्यालय मालामाल
नोटाबंदीमुळे परिवहन क्षेत्राशी संबंधित व्यवसायावर परिणाम झाला असला तरीही परिवहन कार्यालयाच्या महसुलात दुप्पट वाढ झाली आहे. परिवहन विभागाने जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने 1 ते 8 नोव्हेंबरदरम्यान असलेला सव्वाकोटीचा महसूल ता. 9 ते 17 नोव्हेंबरदरम्यान दोन कोटी पन्नास लाख इतका झाला आहे.

व्यवसाय 50 टक्के घटला,
प्रवासी वाहतुकीवरही परिणाम
कोट्यवधींचे नुकसान
परिवहन विभागाची वसुली दुप्पट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com