वाहन खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

उस्मानाबाद - बीएस 3 इंजिन असलेल्या वाहनांवर बंदी घालण्यात आल्याने शुक्रवारी (ता. 31) वाहन खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. शहरातील सर्वच कंपन्यांच्या शो-रूमबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याने काही शो-रूमचे दरवाजे बंद ठेवावे लागले. 

उस्मानाबाद - बीएस 3 इंजिन असलेल्या वाहनांवर बंदी घालण्यात आल्याने शुक्रवारी (ता. 31) वाहन खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. शहरातील सर्वच कंपन्यांच्या शो-रूमबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याने काही शो-रूमचे दरवाजे बंद ठेवावे लागले. 

भारत स्टेज थ्री मानांकित इंजिन असलेल्या वाहनांची विक्री व नोंदणी एक एप्रिलपासून बंद होत आहे. या निर्णयामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मोटारवाहन कंपन्यांनी किमतीवर सूट देत उपलब्ध दुचाकींची विक्री केली. गुरुवारी (ता. 30) संध्याकाळाही विविध वाहन कंपन्यांच्या शो-रूमबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती. 31 मार्चपर्यंत सर्वच बीएस-3 वाहनांची विक्री व्हावी, यासाठी वाहनाच्या किमतीवर आकर्षक सूट देण्यात आली. सकाळी नऊ वाजेपासूनच वाहनांच्या शो-रूमबाहेर नागरिक जमले होते. दहा वाजता जेव्हा एका वाहन कंपनीच्या शो-रूमचे दार उघडले, तेव्हा आपला आधी नंबर लागावा या अपेक्षेने अनेक ग्राहक एकदमच शोरूममध्ये गेले. ही गर्दी व्यवस्थापनाला आवाक्‍यात आणणे कठीण जात होते. त्यामुळे अखेर शो-रूमचे शटर बंद करावे लागले. त्यामुळे शो-रूमच्या बाहेरही नागरिकांची मोठी गर्दी झाली. गर्दी टाळण्यासाठी एकेकास आत प्रवेश दिला जात होता. रस्त्यावरून जाणाऱ्या बघ्यांची संख्याही मोठी होती. प्रत्येकजण काय झाले, याची विचारपूस करीत होता. तर दुसरीकडे वाहनांवर मोठी सूट मिळत असल्याची बातमी ग्रामीण भागातही पोचली होती. खात्री करून घेण्यासाठी नागरिक मोबाईलवरून माहिती घेत होते. नवीन गाड्या विक्री होत आहेत की जुन्या आहेत, असा प्रश्‍नही ग्रामीण भागातून विचारला जात होता. बहुतांश दुचाकींवर पाच ते 15 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात होती. अनेक नागरिक वाहन खरेदीसाठीचे पैसे भरण्यासाठी रांगेत थांबत होते. वाहनाचा स्टॉक संपेपर्यंतच सूट असल्याने प्रत्येकाला सूट मिळण्याची अपेक्षा होती. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी झालेल्या गर्दीपेक्षाही जास्त गर्दी झाल्याचे चित्र या वेळी पाहायला मिळाले. 

कॅशलेस नव्हे, रोखच 
शासनाकडून कॅशलेस व्यवहारास प्राधान्य दिले जाते; परंतु शुक्रवारी बहुतांश नागरिकांनी दुचाकी खरेदीसाठी रोखीने व्यवहार केले. दरम्यान काही नागरिकांना पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत होती. पैसे काढण्यासाठी बॅंकेत तसेच एटीएमवर नागरिकांच्या रांगा दिसून येत होत्या. कॅशलेस नाही तर रोखीनेच व्यवहार करणाऱ्यांना दुचाकीवर सूट मिळत असल्याचे चित्र शो-रूममध्ये पाहायला मिळत होते. 

Web Title: Customer for the purchase of vehicles