सायबर भामट्यांचा तिघांना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

औरंगाबाद - क्रेडिट कार्ड बंद पडले, नवीन मिळवून देतो, पतमर्यादा वाढवून देतो, तसेच एटीएममधून पैसे काढून देतो, अशी थापा मारून भामट्यांनी तिघांची एक लाख तीन हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात भामट्यांविरुद्ध सोमवारी (ता. 20) गुन्ह्याची नोंद झाली. 

औरंगाबाद - क्रेडिट कार्ड बंद पडले, नवीन मिळवून देतो, पतमर्यादा वाढवून देतो, तसेच एटीएममधून पैसे काढून देतो, अशी थापा मारून भामट्यांनी तिघांची एक लाख तीन हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात भामट्यांविरुद्ध सोमवारी (ता. 20) गुन्ह्याची नोंद झाली. 

सखाराम राधाजी काळे हे खासगी नोकरी करीत असून, गजानननगर हडको एन-11 येथे राहतात. त्यांना भामट्याचा फोन आला. दिल्ली येथील भारतीय स्टेट बॅंकेतून बोलत असल्याचे त्याने सांगितले. क्रेडिटकार्ड बंद पडेल, त्यापूर्वीच पत मर्यादा वाढवून देतो, असे त्याने काळे यांना सांगितले. यावर काळे यांचा विश्‍वास बसला. भामट्याने क्रेडिटकार्ड क्रमांक व ओटीपी क्रमांकाची विचारणा केली. काळे यांनी भामट्याला सर्व माहिती दिली. यानंतर भामट्याने काळे यांच्या क्रेडिटकार्डवरून ऑनलाइन शॉपिंग करून फसवणूक केली. दुसरा प्रकार अभिषेक रावसाहेब पाटील (सिडको, एन-आठ) यांच्या बाबतीत घडला. त्यांना सोमवारी भामट्याचा फोन आला. वांद्य्रातील आयसीआयसीआय बॅंकेतून बोलत असल्याचे सांगत त्याने क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याची थाप पाटील यांना मारली. नवे कार्ड घेण्यासाठी माहिती विचारली. विश्‍वास बसल्याने पाटील यांनी क्रेडिटकार्डची संपूर्ण माहिती भामट्याला दिली. काम फत्ते झाल्याने भामट्याने फोन कट केला. त्यानंतर सात हजार 998 रुपयांची ऑनलाइन खरेदी केली. याबाबतचा संदेश पाटील यांना मोबाईलवर प्राप्त झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सिडको ठाणे गाठून तक्रार दिली. तिसरा प्रकार मुरलीधर आनंदराज मोरे यांच्याबाबतीत घडला. ते सेवानिवृत्त असून साफल्यनगर, मयूरपार्क येथे राहतात. ते पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रावर गेले. त्या वेळी अनोळखी तिशीतल्या तरुणाने पैसे काढून देतो, असे सांगत एटीएमचा पासवर्ड विचारला. त्यानंतर एटीएमजवळ खटाटोप केला व खात्यातून पैसे निघत नसल्याचे सांगितले. यानंतर एटीएम कार्ड स्वतःजवळच ठेवून प्रोझोनमॉलमध्ये गेला व तेथून चाळीस हजार दोन वेळा काढले. ऐंशी हजार रुपये खात्यातून कपात झाल्याचा संदेश मोरे यांना मोबाईलवर आला. तरुणाने फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी या प्रकरणात तक्रार दिली. 

Web Title: cyber crime in aurangabad