'नवे पर्व, बहुजन सर्व'ने दुमदुमले नांदेड

Dalit Rally in Nanded
Dalit Rally in Nanded

नांदेड - "नवे पर्व, बहुजन सर्व‘ या व अन्य घोषणांनी रविवारी (ता. 16) नांदेड शहर दुमदुमून गेले. निमित्त होते ते "ऍट्रॉसिटी‘च्या समर्थनासह अन्य विविध मागण्यांसाठी निघालेल्या निर्धार महामोर्चाचे. "ऑक्‍टोबर हीट‘च्या कडक उन्हात सुमारे दोन तास पायपीट करीत मुलांसह ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतलेला लाखोंच्या संख्येचा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चानिमित्त सकाळी सातपासून दुपारी तीनपर्यंत शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. 

अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी, मुस्लिम, आदिवासी बांधवांतर्फे महिनाभरापासून या निर्धार महामोर्चाची तयारी सुरू होती. तालुक्‍याच्या ठिकाणी तसेच गावागावांत बैठकी घेऊन नियोजन झाले होते. त्यामुळे जिल्हाभरातील मोर्चेकरी रेल्वे, बस, खासगी वाहनांच्या माध्यमातून पहाटेपासूनच शहरात येऊ लागले होते. त्यामुळे सकाळी अकरापर्यंत शहरातील सर्व रस्ते मोठ्या गर्दीने फुलून गेले. नवा मोंढा भागातून सकाळी अकराला मोर्चाला सुरवात झाली. व्हीआयपी रस्ता, आयटीआय, शिवाजीनगर रस्ता, दादरा पूल, कलामंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे तो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आला. विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक, डॉक्‍टर, वकील, नोकरदार, विविध संस्था, संघटना, पक्षांचे पदाधिकारी आदी सर्वांचाच मोर्चात सहभाग होता. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कोळी, आदिवासी, मुस्लिम आदी समाजांच्या वतीनेही सहभाग नोंदवून मोर्चाला पाठिंबा देण्यात आला. 
डोक्‍यावर कडक ऊन असतानाही हातात झेंडा घेऊन "जय भीम‘चा नारा देत तब्बल दोन तास मोर्चेकरी चालत होते. मोर्चाचे ठिकठिकाणी स्वागत केले जात होते. मोर्चाच्या मार्गावर मोर्चेकऱ्यांसाठी अल्पोपाहार, चहा-पाण्याची व्यवस्थाही होती. शिवाजी पुतळ्याजवळ सभास्थानी मोर्चा आल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला व घोषणांनी शहर दुमदुमून गेले. सभास्थळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन झाले. काही मुलींनी उपस्थितांसमोर शासनाला देण्यासाठीच्या निवेदनाचे वाचन केले. मुलींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. राष्ट्रगीताने दुपारी दोन वाजता मोर्चाचा समारोप झाला. 

विद्यार्थी बनले स्वयंसेवक 
शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोर्चादरम्यान स्वयंसेवक म्हणून काम केले. मोर्चानिमित्त मोठ्या संख्येने वाहने येणार हे गृहीत धरून शहरात येणाऱ्या रस्त्यांवर विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त लावला होता. मोर्चा अतिशय शांततेत पार पडला. मोर्चानंतरही सर्व मोर्चेकरी आपआपल्या मार्गाने गावी परतले. 

  • शहरी, ग्रामीण भागातून मोठा सहभाग 
  • पहाटेपासूनच मोर्चेकरी शहरात, वाहनांची रांग 
  • विद्यार्थी, महिला, तरुणींची विशेष व्यवस्था
  • "हम भी आये लाखोंसे, तुम भी देखो आखोंसे‘ यासह अनेक घोषणा 
  • निळे झेंडे घेऊन घोषणांचा गजर 
  • ठिकठिकाणी मोर्चाचे स्वागत 
  • मोर्चामार्गावर चहा-नाश्‍ता, पाण्याची व्यवस्था 
  • मोर्चानंतर स्वयंसेवकांकडून साफसफाई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com