लातुरात विजयादशमी उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

लातूर - गेले नऊ दिवस शहर व जिल्ह्यात नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर मंगळवारी (ता. ११) विजयादशमी उत्साहात साजरी झाली. शहरातील विविध देवीच्या मंदिरांत सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. सीमोल्लंघन करण्यासाठी शहराच्या चारही दिशा नागरिकांनी गजबजून गेल्या होत्या. या सणानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा मोठया प्रमाणात वापर झाला. यात तरुण, तरुणींचा अधिक पुढाकार राहिला.

लातूर - गेले नऊ दिवस शहर व जिल्ह्यात नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर मंगळवारी (ता. ११) विजयादशमी उत्साहात साजरी झाली. शहरातील विविध देवीच्या मंदिरांत सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. सीमोल्लंघन करण्यासाठी शहराच्या चारही दिशा नागरिकांनी गजबजून गेल्या होत्या. या सणानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा मोठया प्रमाणात वापर झाला. यात तरुण, तरुणींचा अधिक पुढाकार राहिला.

शहरात नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम, उपक्रम घेण्यात आले. आराधी गोंधळ घातला गेला. मंगळवारी विजयादशमी होती. सकाळपासूनच येथील श्रद्धास्थान असलेल्या गंजगोलाई मंदिरात जय जगदंबा देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. येथील अंबिका देवी, कालिकादेवी, दुर्गादेवी, पद्मावती देवी, हिंगुलअंबिकादेवी आदी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या दिवशी सीमोल्लंघनाला अधिक महत्त्व असते. त्यामुळे सायंकाळी शहराच्या चारही बाजूंना लातूरकरांची गर्दी होती. अनेकांनी रेणापूर येथे जाऊन रेणुकादेवीचे दर्शन घेत सीमोल्लंघन केले. अनेकांनी बार्शी रस्ता, औसा रस्ता, नांदेड रस्ता, अंबाजोगाई रस्त्यावर सीमोल्लंघन केले. या सणाच्या निमित्ताने आपट्याची पाने देत एकमेकांना शुभेच्छा दिल्या; तसेच या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा मोठा वापर करण्यात आला. जिल्ह्यात १८४ ठिकाणी देवींची प्रतिष्ठापना करून नवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला. मंगळवारी दुपारनंतर १६५ ठिकाणी वाजत-गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. शहरातही सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. नांदेड रस्त्यावरील दसरा मैदानावर त्याचे विसर्जन करण्यात आले. या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता.

मिरवणूक रोखल्याने वाद
शहरात सामुदायिक दसरा महोत्सव समिती व सार्वजनिक दसरा महोत्सव समिती अशा दोन मिरवणुका काढण्यात आल्या. दोन्ही मिरवणुका येथील गांधी चौकातूनच निघाल्या. सामुदायिक दसरा समितीचे हे ४४ वे वर्ष आहे. त्यामुळे त्यांची मिरवणूक सुरवातीला निघाली. गांधी चौक, आझाद चौक, खडक हनुमान, सुभाष चौक, गंजगोलाई या मार्गाने ती निघाली. त्या पाठोपाठच आमची मिरवणूक निघू द्यावी असा पवित्रा सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतला; पण पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणामुळे पहिली मिरवणूक दूर जाईपर्यंत या मिरवणुकीला गांधी चौकातच थांबवून घेतले. त्यामुळे समितीचे पदाधिकारी व पोलिसांत वाद झाला.

समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काही वेळ गांधी चौकातच ठिय्या मांडला. पहिली मिरवणूक दूर गेल्यानंतर या मिरवणुकीला परवानगी देण्यात आली.