धोंडे खाण्यासाठी आला, अन् जीव गमावून बसला !

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 9 जून 2018

धोंडे खाण्यासाठी सासरवाडीला आलेल्या एका जावयाचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. आठ) दुपारी जूना कौठा भागात घडली. 

नांदेड - धोंडे खाण्यासाठी सासरवाडीला आलेल्या एका जावयाचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. आठ) दुपारी जूना कौठा भागात घडली. 

जालना जिल्ह्यातील परतूर येथील एसटी महामंडळाचे सेवानिवृत नियंत्रक सत्यकुमार नारायण दरबसवार (वय ६०) यांची सिडको, नांदेड येथे सासरवाडी आहे. ते आपल्या कुटूंबियांसह धोंडे खाण्यासाठी आले होते. धोंडे खाण्यापूर्वी पवित्र गोदावरी नदी पात्रात ते कौठा शिवारात अंघोळ करण्यासाठी शुक्रवारी (ता. आठ) दुपारी आले. त्यांनी कपडे उतरवून ते नदी पात्रात उतरले. परंतु अंघोळ करत असतांना ते थोडे आत जाताच वाळू उपसा केलेल्या ठिकाणी खोल खड्ड्यात ते पडले. त्यांना पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. तब्बल दोन तासांनी ही घटना उघडकीस आली.

नांदेड ग्रामिण ठाण्याचे पोलिस हवालदार ज्ञानोबा केंद्रे यांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तिथे असलेल्या मोबाईलवरून मृतदेहाची ओळख पटली. दिपक माधव यन्नावार यांच्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास श्री. ज्ञानोबा केंद्र हे करीत आहेत.

Web Title: death news in nanded district