दोन महिलांचा विहिरीत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

औराद शहाजानी - माळेगाव (ता. निलंगा) येथील दोन महिला विहिरीतील पाणी आणण्यासाठी गेल्या असता, पाय घसरून पडल्याने दोघींचाही मृत्यू झाला.

औराद शहाजानी - माळेगाव (ता. निलंगा) येथील दोन महिला विहिरीतील पाणी आणण्यासाठी गेल्या असता, पाय घसरून पडल्याने दोघींचाही मृत्यू झाला.
गुरुवारी सायंकाळी प्रियंका प्रेमनाथ बडुरे (वय 30) व अनुराधा गोपाळ बडुरे (वय 26) या आपल्या सासू जिजाबाई बडुरे यांच्यासह शेतात खुरपण्यासाठी गेल्या होत्या. तहान लागल्यामुळे दोन्ही सुना जवळ असलेल्या विहिरीत पाण्यासाठी गेल्या. त्यापैकी एक पाय घसरून आतमध्ये पडली. तिला वाचविण्यासाठी दुसरी जात असताना ती बुडाली. शेजारील शेतात काम करीत असलेल्या धोंडिबा बडुरे यांना मोठा आवाज आल्याने विहिरीजवळ आले असता, दोघीही बुडत असताना दिसल्या. परंतु पोहता येत नसल्याने व जवळ कोणीही वाचविण्यास नसल्याने दोघींचा मृत्यू झाला. रात्रभर विहिरीतील पाणी काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. औराद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.