बीड जिल्ह्यात तापासह डेंगीचे रुग्ण वाढले

बीड जिल्ह्यात तापासह डेंगीचे रुग्ण वाढले

बीड - ऐन पावसाळ्यात वातावरणातील वाढलेली गर्मी आणि अस्वच्छता या कारणांनी ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे स्वाईन फ्लूचे दोन आणि डेंगींच्या रुग्णांची संख्याही वाढल्याने सरकारी दवाखान्यांसह खासगी दवाखाने वरील आजारांच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. 

मागील पंधरा दिवसांपासून तापीच्या आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे, तर गेल्या आठवड्यापासून डेंगी रुग्णही आढळायला सुरवात झाली आहे.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि बीडच्या जिल्हा रुग्णालयातील मेडिसीन वॉर्डामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्णांची संख्या झाली आहे. पंधरवड्यापूर्वी वडवणी तालुक्‍यातील एका डॉक्‍टराच्या वडिलांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून बीडमध्ये चार संशयित रुग्ण आढळले. यातील एकाच्या स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रुग्णांची संख्या पाच हजारांपुढे
दरम्यान, जिल्ह्यात ताप आणि डेंगीसदृश रुग्णांची संख्या पाच हजारांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. सर्वच खासगी रुग्णालये ताप आणि डेंगीसदृश तापीच्या आजाराच्या रुग्णांच्या गर्दीने भरली आहेत. तर, सरकारी रुग्णालयांतही अशा रुग्णांची मोठी संख्या वाढली आहे. बाल रुग्णालयांतही अशाच रुग्णांची संख्या अधिक आहे.  

अस्वच्छताच महत्त्वाचे कारण
दरम्यान, पाऊस थांबलेला असला तरी वातावरणातील बदल आणि गर्मी याचा परिणाम तर झालाच आहे. शिवाय शहरांसह ग्रामीण भागात तुंबलेल्या नाल्या आणि साठलेली गटारे यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनच असे आजार वाढले आहेत.

तपासणीच नाही खात्रीची
जास्तीचा ताप असलेला रुग्ण खासगी दवाखान्यात जाताच प्राथमिक उपचाराला सुरवात करून लगेच डेंगी आणि प्लेटलेट्‌सची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. यावेळी डेंगी पॉझिटिव्ह आणि प्लेटलेट्‌स कमी असा अहवाल ठरलेला आहे. मात्र, अनेक ठिकाणी रॅपिड किटद्वारे होणाऱ्या या तपासण्याच खात्रीच्या नाहीत. डेंगीचे खात्रीशिर निदान होण्यासाठी एलायझा टेस्ट होणे गरजेचे आहे. 

तालुक्‍यांच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागात डीएमएलटी पदवीधारकांच्या तपासणी प्रयोगशाळा असतात. या प्रयोगशाळांमध्ये रॅपिड किटमधून या तपासण्या केल्या जातात. वास्तविक डेंगीची तपासणी रॅपिड किटद्वारे बंद करण्याचा शासनादेश असला तरी सर्रास अशीच तपासणी केली जाते. सध्या तापीच्या रुग्णांची वाढ झाली असून रुग्ण जाताच त्याला डेंगी आणि प्लेटलेट्‌सची तपासणी सुचविली जाते. त्यात डेंगी पॉझिटिव्ह आणि प्लेटलेट्‌स कमी झाल्याचा अहवाल येतो. यातच रुग्ण आणि नातेवाइकांची घाबरगुंडी उडते आणि रुग्णाला थेट आयसीयूमध्येच पाठविले जाते. 

एलायझा टेस्टला लागतात सहा तास
डेंगीचे अचूक निदान हे एलायझा टेस्टद्वारेच होते. यासाठी सहा तासांचा कालावधी लागतो; तसेच वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) आणि पॅथॉलॉजिस्ट यांनी केलेल्या टेस्टमधून हे अचूक निदान होते. मात्र, अनेक ठिकाणी रॅपिड किटद्वारेच तासाभरात डेंगी आणि प्लेटलेट्‌स कमी झाल्याचा रिपोर्ट दिला जातो.

सरकारी रुग्णालयांमध्ये एलायझा टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत डेंगी पॉझिटिव्ह आढळला; तर तसे उपचार केले जातात. डेंगीचे खात्रीशिर निदान करणारी हीच टेस्ट आहे. प्लेटलेट्‌स कमी झाल्या तरी भीतीचे फार कारण नसते.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com