एका नेत्याचा वनवास संपला, दुसऱ्याचा कायम 

Dhananjay Munde, Vinayak Mete
Dhananjay Munde, Vinayak Mete

बीड : धनंजय मुंडे आणि विनायक मेटे हे राज्य पातळीवर चर्चेत राहणारे बीड जिल्ह्यातील दोन नेते. दोघांच्या शब्दाला राज्यात वजन आहे. या नेत्यांपैकी धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यापासून सुरू असलेली पराभवाची मालिका परळी नगरपालिकेतील जोरदार विजयाने खंडित झाली. विनायक मेटे यांच्या मागे लागलेले पराभवाचे शुक्‍लकाष्ट मात्र काही केल्या सुटत नाही. 


मराठा महासंघाच्या आरक्षण चळवळीतून राजकारणात उदयास आलेल्या विनायक मेटेंना 1995 मध्ये विधान परिषदेत प्रवेश करता आला त्यावेळी शिवसेना -भाजप युतीची सत्ता होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि पुन्हा महायुतीचा घटक पक्ष म्हणून सहावेळा विधान परिषदेचा सदस्य म्हणून शपथ घेण्याची त्यांना संधी मिळाली पण स्थानिक पातळीवर त्यांना जनमान्यता मिळाली नाही. राष्ट्रवादीशी जवळीक साधत त्यांनी 2006 च्या पालिका निवडणुकीत बीडमधून चार समर्थकांसाठी उमेदवारी मिळवली खरी पण, त्यांचे पक्षातीलच विरोधक जयदत्त क्षीरसागर यांनी सर्व उमेदवारांचा पराभव घडवून मेटेंना एक प्रकारे इशाराच दिला. 2007 च्या जिल्हा परिषद निवडणुकीतही मेटेंच्या नांदूरघाट गावातच त्यांचे समर्थक भानुदास जाधव अपक्ष संतोष हंगेंकडून पराभूत झाले. 2012 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची पराभवाची परंपरा भावजयीच्या पराभवामुळे कायम राहीली.

क्षीरसागरांनी केलेल्या दगाफटक्‍याचा हिशोब मेटेंनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत चुकता केला. क्षीरसागर यांच्या सर्व विरोधकांना एकत्र करून भाजपच्या केशव आंधळेंना रसद पुरवत क्षीरसागरांना पराभूत केले. त्यानंतर मेटे स्वतः 2014 मध्ये बीड मतदार संघातून भाजपच्या चिन्हावर क्षीरसागरांच्या विरोधात उभे ठाकले. पण मोदी लाटेतही मेटेंच्या नशिबी पराभवच आला परंतु या पराभवाला विरोधकांपेक्षा भाजपतील घरभेदीच अधिक जबाबदार होते. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन विरोधकांशी त्यांना लढावे लागत आहे. दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी झालेल्या पिंपळनेर (ता. बीड) जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात मेटेंनी शिवसंग्रामचा उमेदवार रिंगणात उतरवला. पण, येथेही भाजप - राष्ट्रवादीने हातमिळवणी केल्याने शिवसंग्रामच्या उमेदवाराला थोडक्‍यात पराभव पत्करावा लागला. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत तर शिवसंग्रामचा दारुण पराभव झाला. बीडमध्ये 50 पैकी केवळ 30 जागांवर उमेदवार उभे केलेल्या शिवसंग्रामचे बहुतेक उमेदवार तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप गोरे पाचव्या स्थानावर राहिले. 


मुंडेंना सुर गवसला 
या पार्श्‍वभूमीवर भाजपमध्ये असतानाच युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे एवढीच ओळख असलेले धनंजय मुंडे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले ते परळी पालिकेच्या निवडणुकीतील बंडामुळे. त्यानंतर अडीच महिन्यांनी झालेल्या जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत परळी तालुक्‍यात राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नव्हती. पुढे जिल्हा बॅंक, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला होता. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर घेतले आणि त्यानंतर थेट विरोधीपक्ष नेता केले. मोठ्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडेंना परळी नगरपालिकेत सुर गवसला. 33 पैकी 27 जागा जिंकत मुंडेंनी पक्षाला काय दिले या स्वकीयांच्या प्रश्‍नाला त्यांनी तडाखेबंद उत्तर दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com