पदविकेत नापास हर्षलने दिला 16 जणांना रोजगार 

harshal
harshal

औरंगाबाद : शिक्षण सोडून राजकारणात नसत्या उठाठेवी करणारा मुलगा आई-वडिलांसाठी डोकेदुखी ठरला होता. तोच मुलगा ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरला. दोन भाड्याच्या मशिन्ससोबत सुरू केलेला प्रवास 11 मशिन्स आणि 18 लाख टर्नओव्हरपर्यंत पोचला आहे. विशेष म्हणजे, पदविकेच्या पहिल्याच वर्षात दहापैकी आठ विषयांत नापास झालेल्या बावीसवर्षीय हर्षल पाटीलने स्टार्टअपच्या माध्यमातून 16 जणांच्या हाताला रोजगार दिला आहे. 

हर्षल हा मूळचा सांगली जिल्ह्यातील कुरळपचा. जन्माच्या वर्षीच वडिलांच्या नोकरीनिमित्त औरंगाबादेत स्थायिक झाला. राजकारणी मित्रांमध्ये रमणाऱ्या हर्षलने घरच्यांच्या आग्रहाखातर अभियांत्रिकी पदविकेला प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी केवळ दोनच विषय सुटल्याने शिक्षणच सोडले. प्रॅक्‍टिकलमध्ये जगणाऱ्या हर्षलने लगोलग इंडो जर्मन टूलरूम गाठले. तिथे "सर्टिफिकेट कोर्स इन टूल ऍण्ड डायमेकिंग' वर्षभर शिकला. निम्मेच पेपर दिल्याने प्रमाणपत्र मात्र हुकले. घरून तगादा वाढल्याने "बीएस फिक्‍स-टेक' टूलरूमला वर्षभर नोकरी स्वीकारली. हाच त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. 
नातेवाइकांकडून "मुलगा काय करतो?' असे प्रश्‍न घरच्यांना विचारले जायचे. मुलाचे काय सुरू आहे? हे कळायला घरच्यांना मार्ग नव्हता.

एक दिवस कंपनी सुरू करीत असल्याचे सांगत त्याने धक्‍काच दिला. थर्ड पार्टी व्हेंडर म्हणून काम मिळणार असल्याने तीन मार्च 2017 ला कामाला सुरवात केली. दोन हजार रुपये महिन्याप्रमाणे भाड्याच्या दोन प्रेस मशिन्स घेत त्याने वाळूजच्या प्लॉट-ई 52 मध्ये "शीतकमल इंडस्ट्रीज'च्या माध्यमातून काम  मिळविले. डिस्कव्हरच्या ब्रेक पायडलला लागणारा यू ब्रॅकेटचे पार्ट हे त्याचे पहिलेच काम. मित्रांना सोबत घेऊन दोन महिने अहोरात्र काम करीत 22 हजार रुपयांची कमाई केली. वर्षभरात 16 प्रकारची कामे करताना तीन-साडेतीन लाख कमाविले. आईचा नेकलेस, बांगड्या, वडिलांची स्वत:ची चेन याकामी लावत आता त्याची स्वत:ची 11 प्रेस मशिन्स असून वार्षिक टर्नओव्हर 18 लाखांच्या घरात पोचला आहे. 

ऑटो उद्योगांना पुरवतोय पार्ट 
"शीतकमल इंडस्ट्री'ला ओम ऑटो कंपोनंटने थर्ड पार्टी व्हेंडर म्हणून पहिले काम दिले. त्यापाठोपाठ बाबा इंजिनिअर्स आणि नागरगोलकर प्रेस कंपोनंट या सबव्हेंडर कंपन्यांची कामे मिळाली आहेत. यशश्री, श्रीगणेश, औरंगाबाद इलेक्‍ट्रिकल, बडवे इंजिनिअरिंग या व्हेंडर कंपन्यांच्या माध्यमातून बजाज आणि पियाजिओ कंपनीच्या वाहनांना "शीतकमल'ने तयार केलेले पार्ट पुरविले जात आहेत. 

साइड स्टॅंडपासून चाइल्ड पार्ट 
दुचाकीचे साइड स्टॅंड, किक स्टॉपर, ब्रेक लिव्हर, होल्डर स्टेप सेटमधील चार चाइल्ड पार्ट, दुचाकी आणि चारचाकींचे नऊ प्रकारचे चाइल्ड पार्ट; तसेच रिक्षाची वेल्डिंग असेम्ब्लीची कामेही "शीतकमल'ला मिळत आहेत. 

हर्षलच्या ऑपरेटरचेही स्टार्टअप 
"शीतकमल इंडस्ट्री'मध्ये ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या संतोषने दोन महिन्यांपूर्वी स्टार्टअप केले आहे. वर्षभरातील कमाईतून 60 हजार रुपये बाजूला काढत त्याने ही कंपनी सुरू केली आहे. हर्षलनेच दोन कामे त्याला दिली. 

स्वत:वर विश्‍वास ठेवा. शिक्षण घेतलेच पाहिजे; पण पुस्तकी ज्ञान हेच सर्वकाही नाही. मनासारखे काम नाही झाले तरी त्यातून परत उठा. आत्मविश्‍वास बाळगा. कामात सातत्य राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पुढच्या दोन वर्षांत सोबत काम करणारे 50 हून अधिक व्हावेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. 
- हर्षल पाटील, नवउद्योजक, औरंगाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com