जिल्हा शंभर टक्के साक्षर होण्यासाठी प्रमाणपत्रांची प्रतीक्षा

जिल्हा शंभर टक्के साक्षर होण्यासाठी प्रमाणपत्रांची प्रतीक्षा

चार वर्षांतील अकरा परीक्षांचे प्रमाणपत्र शिल्लक; सतरा हजार निरक्षरांकडून दोनदा परीक्षा

लातूर - जिल्हा शंभर टक्के साक्षर होण्यासाठी मागील चार वर्षांत झालेल्या नवसाक्षरांच्या मूलभूत साक्षरता परीक्षेची प्रमाणपत्रे येण्याची प्रतीक्षा आहे. या प्रमाणत्रांच्या प्रतीक्षेतच जिल्ह्यातील सतरा हजार निरक्षरांनी ही परीक्षा दोनवेळा दिल्याची शक्‍यता आहे. यातूनच जिल्ह्यात एक लाख १९ हजार ७२ नवसाक्षर (निरक्षर) आढळून आले असताना एक लाख ३८ हजार नवसाक्षरांनी ही परीक्षा दिल्याचे पुढे आले आहे.

जिल्हा परिषदेच्या निरंतर शिक्षण (प्रौढ शिक्षण) विभागाच्या वतीने सारक्षरतेसाठी प्रयत्न केले जातात. यातच महिला साक्षरतेचे प्रमाण पन्नास टक्‍क्‍यांहून कमी असलेल्या लातूरसह राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्र सरकारने साक्षर भारत अभियान हाती घेतले. या अभियानातून प्रत्येक गावात महिला व पुरुष अशा दोन प्रेरकांची दरमहा दोन हजार रुपये मानधनावर नियुक्ती करण्यात आली. 

जिल्ह्यात सध्या ७८६ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात एक हजार ५७२ प्रेरक कार्यरत आहेत. या प्रेरकांनी जानेवारी ते मार्च २०१२ या काळात प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन निरक्षरांचा शोध घेतला. यात जिल्ह्यात एक लाख १९ हजार ७२ निरक्षर आढळून आले. या निरक्षरांना नवसाक्षर समजून मूलभूत साक्षरता परीक्षेला बसविण्यात आले. त्यापूर्वी त्यांना प्रेरकांच्या माध्यमातून प्रत्येक गावात सुरू करण्यात आलेल्या प्रौढ शिक्षण केंद्रात साक्षरतेचे धडे देण्यात आले. दरवर्षी मार्च व ऑगस्टमध्ये मूलभूत साक्षरता परीक्षा घेण्यात येते. २०१२ पासून आतापर्यंत बारा परीक्षा घेण्यात आल्या. त्यापैकी केवळ ऑगस्ट २०१५ या महिन्यात झालेल्या परीक्षेचे प्रमाणपत्र निरंतर शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. अन्य अकरा परीक्षांचे प्रमाणपत्र न आल्याने निरक्षर साक्षर झाल्याचा दावा ठोसपणे विभागाला करता येत नाही. प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेतच ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या एक लाख ३८ हजारांवर पोचली असल्याने सतरा हजार जणांनी दोनवेळा ही परीक्षा दिल्याची शक्‍यता विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. दरम्यान, प्रेरकांचे पंचवीस महिन्यांचे मानधन थकल्याने अभियानाला जिल्ह्यात खीळ बसली आहे.

शंभर जणांची इयत्तेची परीक्षा
मूलभूत साक्षरता परीक्षेचे प्रमाणपत्र आल्यानंतर जिल्हा शंभर टक्के साक्षर झाला, असे म्हणता येईल. यासोबत साक्षरतेचे धडे गिरवलेल्या व मूलभूत साक्षरता परीक्षा दिलेल्यांनी आता अंगठे करणे बंद करण्याची गरज निरंतर शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी यांनी व्यक्त केली. साक्षरता अभियानाचे पुढचे पाऊल म्हणून जिल्ह्यात साक्षरता परीक्षा दिलेल्या शंभर जणांना त्यांच्या पात्रतेनुसार तिसरी, पाचवी व आठवीच्या परीक्षेला बसविण्यात येणार आहे. यासाठी आमदारांनी प्रत्येक तालुक्‍यात निश्‍चित केलेल्या आदर्श ग्राममधून प्रत्येकी दहा जणांची निवड केल्याचे अनुपमा भंडारी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com