डॉक्‍टरांच्या आंदोलनाने रुग्णसेवा ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

औरंगाबाद - राज्यात ठिकठिकाणी डॉक्‍टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ निवासी डॉक्‍टरांनी सुरू केलेल्या सामूहिक रजा आंदोलनाला आता इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पाठिंबा दिला. त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत खासगी डॉक्‍टरांनीही गुरुवारी (ता. 23) बंद पाळला. अत्यावश्‍यक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न होत असला तरी या आंदोलनामुळे रुग्णसेवा पूर्णतः ठप्प झाली. 

औरंगाबाद - राज्यात ठिकठिकाणी डॉक्‍टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ निवासी डॉक्‍टरांनी सुरू केलेल्या सामूहिक रजा आंदोलनाला आता इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पाठिंबा दिला. त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत खासगी डॉक्‍टरांनीही गुरुवारी (ता. 23) बंद पाळला. अत्यावश्‍यक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न होत असला तरी या आंदोलनामुळे रुग्णसेवा पूर्णतः ठप्प झाली. 

नांदेडमध्ये निषेध 
नांदेड-  निवासी डॉक्‍टरांच्या आंदोलनाला आज शहर व जिल्ह्यातील खासगी डॉक्‍टरांनी पाठिंबा देत काम बंद ठेवले. शहरात अनेक डॉक्‍टर आज एकत्र आले आणि त्यांनी राज्यात होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनेचा निषेध केला. सरकारने यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली. दरम्यान, अत्यावश्‍यक सेवा सुरू असल्या तरी जिल्हाभरात रुग्णांचे हाल होत आहेत. 

परभणीत बंद पाळून निषेध 
परभणी -
निवासी डॉक्‍टरांच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) आजपासून बेमुदत संपाला सुरवात झाली. परभणीसह नऊ तालुक्‍यांमधील डॉक्‍टर संपात उतरले आहेत. तालुका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देत हल्ल्यांचा निषेध केला. परभणी शहरातील 450 खासगी रुग्णालये बंद ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एक हजार 200 डॉक्‍टर यात सहभागी आहेत. शहरातील खासगी रुग्णालये बंद असल्याने खेडेगावातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल झाले. अनेकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतल्याने तेथे गर्दी पाहावयास मिळाली. 

जिल्हा रुग्णालयात गर्दी 
उस्मानाबाद -
 निवासी डॉक्‍टरांच्या आंदोलनाला खासगी डॉक्‍टरांनीही आजपासून पाठिंबा दिला आहे. खासगी दवाखाने दिवसभर बंद होते. त्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये गर्दी वाढली. गंभीर रुग्णांवर उपचार करत डॉक्‍टरांनी तातडीची सेवा पुरविण्यास होकार दिला आहे. अपघाताच्या रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार केल्याचेही काही डॉक्‍टरांनी सांगितले. दरम्यान, शासकीय रुग्णालयात दररोज साधारण एक हजार ते 1100 रुग्णांची तपासणी होते, आज त्यामध्ये तीनशे ते साडेतीनशेंनी वाढ झाल्याचे दिसले. रुग्णांच्या सोयीसाठी आवश्‍यकतेनुसार शासकीय रुग्णालयाच्या वेळेत वाढ केली जाईल, असे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश करंजकर यांनी सांगितले. 

एक हजार डॉक्‍टरांचा "बंद' 
लातूर - शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांनी सुरू केलेल्या सामूहिक रजा आंदोलनाला पाठिंबा म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जिल्ह्यातील एक हजार डॉक्‍टरांनी बंद पाळला. सर्वांनी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद ठेवला; पण अत्यावश्‍यक रुग्णांवर उपचार केले. बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने अनेक रुग्णांचे हाल झाले. काही रुग्णांना उपचाराविनाच परत जावे लागले. शासकीय रुग्णालयातील ओपीडीतील रुग्णांची संख्या मात्र वाढली. 

दीड हजार डॉक्‍टर सहभागी 
बीड - इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पुकारलेल्या संपाला होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, दंत, निमा आदी संघटनांनी पाठिंबा दिला. यामुळे जिल्ह्यातील खासगी आरोग्य सेवा ठप्प झाली. अत्यावश्‍यक सेवा मात्र सुरू होती. संपात साधारण दीड हजार डॉक्‍टर सहभागी झाल्याचा अंदाज आहे. दोनशेवर तज्ज्ञांचाही यामध्ये समावेश होता. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. 

Web Title: Doctor Strike