सुरक्षेच्या मागणीसाठी डॉक्‍टरांचे धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

बीड - मागील काही काळात राज्यात डॉक्‍टरांवरील हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात दहशतीचे व नैराश्‍याचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे डॉक्‍टरांना सुरक्षितता देण्याच्या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (ता. २४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

डॉक्‍टरांवरील हल्ल्यांना प्रतिबंध घालण्यासाठी डॉक्‍टर प्रोटेक्‍शन ॲक्‍ट-२०१० ची अंमलबजावणीदेखील ॲट्रॉसिटी ॲक्‍टप्रमाणे प्रभावी पद्धतीने व्हावी व कायद्यामध्ये काही तरतुदी करून डॉक्‍टरांवरील हल्ल्याचा गुन्हा अजामीनपात्र करण्यात यावा, गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला ७ ते १० वर्षांची शिक्षा करण्यात यावी, निवासी डॉक्‍टरांवर केलेली कार्यवाही तत्काळ मागे घ्यावी, डॉक्‍टरांना सक्षम सुरक्षा प्रदान करावी आदी मागण्यांसाठी आयएमएच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी भेट देऊन डॉक्‍टरांच्या समस्या जाणून घेतल्या. 

या आंदोलनाला रोटरी क्‍लब, रोटरी क्‍लब बीड सिटी, रोटरी क्‍लब मिडटाऊन, पतंजली योग समिती, व्यापारी महासंघ, जय हिंद माजी सैनिक कल्याण मंडळ, अंगणवाडी सेविका संघटना, सावित्रीबाई फुले महिला संघटना, मॅग्मो संघटना, शिवक्रांती युवा परिषद आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलनात एमआयएचे अध्यक्ष डॉ. दिलीप खरवडकर, डॉ. अनिल बारकुल, डॉ. संतोष शिंदे, डॉ. राजेश शिंदे, आयडीएचे डॉ. अशोक उनवणे, डॉ. अभिजित पायगुडे, निमा संघटनेचे डॉ. रमेश घोडके, डॉ. अजित जाधव, डॉ. भुजंग थोरात, हिमा संघटनेचे डॉ. लक्ष्मण जाधव, डॉ. अनिल थोरात, डॉ. अशोक मोरे यांच्यासह शहरातील जवळपास ५०० डॉक्‍टर सहभागी झाले होते.

Web Title: Doctors hold protest to demand security