रात्र होताच... श्‍वानराज्य!

Dog
Dog

औरंगाबाद - गेल्या काही महिन्यांपासून कचरा, पाण्याने बेहाल झालेले शहरातील नागरिक आता कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत. रात्र होताच प्रत्येक रस्त्यावर मोकाट कुत्र्यांच्या झुंडी फिरत असून, कचऱ्यातील सडलेले अन्न, मांस खाऊन गब्बर झालेल्या या कुत्र्यांना पाहून नागरिकांची भीतीने गाळण उडत आहे. महापालिकेच्या दप्तरी शहरात सुमारे २० ते २२ हजार कुत्रे असल्याची नोंद आहे, तर प्रत्यक्षात ३० हजारांपेक्षा जास्त कुत्रे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नसबंदीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, तरीही कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

शहरातील नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून कचरा, पाणीटंचाईने त्रस्त आहेत. त्यात आता कुत्र्यांचे नवे जीवघेणे संकट उभे राहिले आहे. रात्र होताच प्रत्येक रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी बाहेर पडत आहेत. विशेषतः ज्या भागात मांसविक्रीचे दुकाने जास्त आहेत तिथे रात्री लहान मुले, वृद्धांना बाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रिया बंद होत्या. त्यामुळे संख्या झपाट्याने वाढली आहे. आजघडीला सुमारे ३० हजार कुत्रे शहराच्या विविध भागांत नागरिकांना धडकी भरवत फिरत आहेत. महापालिकेने चार महिन्यांपूर्वी ब्लुक्रॉस या पुण्याच्या संस्थेला कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे काम दिले आहे. एका कुत्र्याच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ९०० रुपये मोजले जातात. संस्थेने आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त कुत्र्यांवर नसबंदी केली आहे. शहरातील कुत्र्यांचे प्रमाण पाहता नसबंदीची मात्रा लागू पडत नसल्याचे चित्र आहे.

आकडे काय सांगतात
कुत्र्यांची महापालिकेकडे असलेली नोंद २२ हजार 
२००६ पासून करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया १३ हजार
वर्षाला अपेक्षित शस्त्रक्रिया सात हजार 
एक कुत्री वर्षाला सरासरी १२ ते १५ पिले देते 
‘घाटी’ रुग्णालयात दररोज आठ ते दहा, तर महिन्याला दीडशेपेक्षा अधिक  जण कुत्रे चावल्याने उपचारासाठी येतात. 

नागरिकांमध्ये प्रचंड दहशत 
आयुक्त हताश...

शहरातील कचरा संपल्याशिवाय कुत्रे संपणार नाहीत, असे हताश उद्गार आयुक्तांनी काढले. कुत्र्यांचा ८० टक्के प्रश्‍न हा कचऱ्याशी संबंधित आहे. त्यामुळे कचरा प्रश्‍न मार्गी लागताच कुत्र्यांचा प्रश्‍न देखील संपेल, असे आयुक्तांनी बुधवारी (ता. २९) स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले. 

आता मुंबईच्या संस्थेची मदत 
नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे काम पुण्याच्या संस्थेला देण्यात आले आहे. त्यात आता मुंबईच्या संस्थेची मदत घेतली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी बुधवारी (ता. २९) संस्थेच्या कामाची मुंबईत जाऊन माहिती घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com