यंदाही होणार नाले‘सफाई’!

Nandkumar-Ghodele
Nandkumar-Ghodele

औरंगाबाद - कचराकोंडीनंतर शहरातील विविध भागांत सर्रासपणे नाल्यांमध्ये कचरा टाकला जात असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी तो उचलला गेला नाही; तर नाल्याकाठच्या घरांमध्ये पावसाचे पाणी घुसून हाहाकार उडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे गतवर्षीच्या पॅटर्नप्रमाणे नाल्यांची साफसफाई करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले. 

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी महापालिका मॉन्सूनपूर्व तयारी सुरू करते. त्यानुसार नालेसफाईवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; मात्र नालेसफाईची कामे नेमका पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर केली जातात. त्यामुळे एखादा मोठा पाऊस होताच नाल्याची घाण वाहून जाते व कंत्राटदार बिले उचलण्यास मोकळे होतात. या पार्श्‍वभूमीवर यंदा उन्हाळ्यातच नालेसफाईचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते; पण कचराकोंडीमुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, नाल्याशेजारी असलेल्या वसाहतींतील नागरिकांनी नाल्यातच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला आहे. 

हा कचरा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच उचलला गेला नाही तर बायजीपुरा, संजयनगर, नागेश्‍वरवाडी, खोकडपुरा, औरंगपुरा, उल्कानगरी, कोकणवाडी या भागांत नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे महापौरांनी प्रभारी आयुक्त नवल किशोर राम व शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याशी सोमवारी (ता. नऊ) चर्चा केली. 

या चर्चेत महापौरांनी मागील वर्षीप्रमाणे नालेसफाईची कामे करण्याचे प्रशासनाला आदेशित केले. आवश्‍यक आहे त्या प्रभागात कंत्राटदाराकडून काम करून घेतले जाणार आहे. गतवर्षी प्रभाग एकमध्ये सहा लाख, दोनमध्ये चार, तीनमध्ये आठ, चारमध्ये पाच, पाचमध्ये नऊ, सहामध्ये नऊ, सातमध्ये पाच, आठमध्ये सहा, तर नऊमध्ये पाच लाख असा ५४ लाखांचा खर्च नालेसफाईवर करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com