पंचवीस लाखांच्या कामासाठी पन्नास हजार नागरिकांना यातना

Aurangabad-Municipal
Aurangabad-Municipal

औरंगाबाद - सिडको एन-सहा परिसरातील मातामंदिरासमोर अवघ्या दोन फुटांचा असलेला नाला रुंद करण्यासाठी एका तपापासून नागरिकांची प्रतीक्षा सुरू आहे. दीड-दोन वर्षापूर्वी या नाल्याने एकाचा बळी घेतल्यानंतर २५ लाख रुपये खर्चाच्या कामाच्या फायलीचा प्रवास गेल्या दीड वर्षापासून संपलेला नाही. ही फाइल चार महिन्यांपासून सहीसाठी आयुक्तांच्या टेबलवर पडून आहे. दरम्यान, कुठलीही तयारी नसताना नाल्याचे काम करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना शनिवारी (ता. २३) नगरसेवक, नागरिकांनी पिटाळून लावले.

शहरात गुरुवारी (ता. २१) रात्री झालेल्या पावसात सिडको एन-सहा भागातील स्नेहनगर येथे उघड्या नाल्यात बुलेटसह पडून चेतन चोपडे या तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. त्यापूर्वी बुधवारी सकाळीच जयभवानीनगर येथील नाल्यात भगवान मोरे यांचा मृतदेह आढळून आला होता. चोवीस तासांत नाल्याने दोन बळी घेतल्याने महापालिकेच्या विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. नाल्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अतिरिक्त आयुक्तांच्या श्रीमुखात एकाने लगावली होती. दरम्यान, शनिवारी मातामंदिर येथील नाल्याचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी गेले असता नगरसेवक, नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. मकरंद कुलकर्णी, शिवाजी दांडगे यांच्यासह नागरिकांनी अर्धवट तयारीवर काम करण्यास विरोध केला. आज नाला खोदून ठेवाल, रविवारी (ता. २४) काम बंद राहते. त्यात पाऊस झाला तर आणखी एखादा बळी जाईल. त्यामुळे तयारी पूर्ण करूनच सोमवारपासून काम सुरू करण्याची मागणी करत अधिकाऱ्यांना परत पाठविण्यात आले. 

‘भूमिगत’मधूनही काम वगळले 
नाल्याचे काम भूमिगत गटार योजनेतून करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती; मात्र काम वगळण्यात आल्याने महापालिका फंड वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाला उरला फक्त दोन फुटांचा 
दहा ते बारा वसाहतींचे पाणी मातामंदिर येथील नाल्याला येऊन मिळते; मात्र नाला केवळ दोन फुटांचा शिल्लक आहे. त्यामुळे बजरंग चौक ते आझाद चौक या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते. त्यात दोन वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्वेक्षण करून नाला रुंद करून त्यावर ढापे टाकण्याची २५ लाखांची फाइल तयार करण्यात आली; मात्र निविदा पूर्ण करण्यासाठी दीड वर्ष लागले. गेल्या चार महिन्यांपासून अंतिम मंजुरीसाठी ही फाइल आयुक्तांच्या टेबलवर असल्याचे नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com