चालक-वाहक बदल नियम अखेर रद्द

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

औरंगाबाद : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागात चालक-वाहकांना कामगार बदल (क्रू-चेंज) नियम लावण्यात आला होता. यामुळे चालक- वाहकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला होता. या विषयी "सकाळ‘ने वृत्त प्रकाशित करताच रविवारी (ता.14) हा नियम रद्द करण्यात आला.
 

औरंगाबाद : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागात चालक-वाहकांना कामगार बदल (क्रू-चेंज) नियम लावण्यात आला होता. यामुळे चालक- वाहकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला होता. या विषयी "सकाळ‘ने वृत्त प्रकाशित करताच रविवारी (ता.14) हा नियम रद्द करण्यात आला.
 

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयातर्फे हा नियम लागू करण्यात आला होता. या नियमामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावर जाणाऱ्या चालक-वाहकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. राज्यभरातील कोणत्याही विभागात हा नियम लागू करण्यात आलेला नव्हता. कमी कर्मचाऱ्यांवर काम करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला होता. एस. टी. महामंडळाच्या नियमानुसार चालक-वाहकांनी आठ तासांत अडीचशे किलोमीटर अंतर पूर्ण करणे गरजेचे आहे. तीनशे ते त्याहून अधिक लांब असलेल्या मार्गावर चालक आणि वाहक ठराविक बसस्थानकावरून बदलले जातात. या वेळेत चालक आणि वाहक दोघेजण आराम करतात. त्यानंतर ते ठराविक तासानंतर परतीच्या मार्गावर लागतात; मात्र प्रादेशिक कार्यालयातर्फे बुधवारी (ता. दहा) क्रू-चेंजचा नियम लागू करण्यात आला. यात वाहक-चालकांना थेट बसमध्ये पाठविण्याचा नियम लावण्यात आला. या नियमाला कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला. तसेच अनेकांनी या नियमामुळे लांब पल्ल्यावर जाण्याचे टाळत जवळचा मार्ग पत्करला. या विषयी "सकाळ‘ने शुक्रवारी (ता.12) "कामगार बदल नियमाचा चालक-वाहकांना फटका‘ या मथळ्याखाली बातमी दिली. याची दखल घेत शनिवारी हा नियम रद्द केल्याचे पत्रक काढण्यात आले आणि रविवारपासून हा नियम रद्द करून पूर्वीप्रमाणे नियम लागू करण्यात आला. चालक-वाहकांनी नियम रद्दचे स्वागत करीत प्रादेशिक व्यवस्थापक, विभाग नियंत्रकाचे आभार मानले.