जनावरांवर अपुऱ्या चाऱ्यामुळे अर्धपोटी राहण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

उस्मानाबाद - छावण्या बंद, पावसाचा पत्ता नसल्याने निम्म्या जिल्ह्यातील जनावरे अर्धपोटीच दिवस काढीत आहेत. त्यातच कडब्याचे भाव गगनाला भिडले असून एका पेंढीचा भाव 30 रुपयांपर्यंत गेल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

उस्मानाबाद - छावण्या बंद, पावसाचा पत्ता नसल्याने निम्म्या जिल्ह्यातील जनावरे अर्धपोटीच दिवस काढीत आहेत. त्यातच कडब्याचे भाव गगनाला भिडले असून एका पेंढीचा भाव 30 रुपयांपर्यंत गेल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल 82 चारा छावण्यांच्या माध्यमातून पशुधन जगविण्यासाठी शासनाने कसरत केली. अनेक जनावरांनी चारा छावणीचा आश्रय घेतला होता. दरम्यान जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही भागांत पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच चारा छावण्या बंद पडल्या. पेरणीपूर्व मशागत बैलांद्वारे केली जाते. त्यामुळे अनेक शेतकरी छावणीतील जनावरे गोठ्यावर घेऊन गेले आहेत; तर काही शेतकऱ्यांना चारा छावणी बंद झाल्याने व पावसायोग्य निवारा नसल्याने जनावरे गोठ्यावर घेऊन जाण्याची वेळ आली.

जिल्ह्याचा अर्धा भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. कडबा संपल्याने, छावण्या बंद झाल्याने जनावरांच्या दावणीला एकही चिपाड शिल्लक दिसत नाही. दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत आहे. जिल्ह्यात अनेक शेतकरी आहेत, त्यांची जनावरे केवळ दावणीला बांधून असतात. अशा जनावरांना चारा उपलब्ध करून दिल्याशिवाय पर्यायच नसलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळत आहे. जिल्ह्याच्या काही भागांत तुरळक पाऊस झाला आहे. जमिनीपासून एक इंचही गवताची वाढ झालेली नाही. काही शेतकरी ओसाड माळरानावर जनावरे चाऱ्यासाठी सोडत आहेत. परंतु, चाराच अपुरा असल्याने अर्धपोटी जनावरे भटकंती करताना दिसत आहेत. दरम्यान आज पाऊस येईल, उद्या येईल, यामुळे याबाबत शेतकरीही काही बोलत नसल्याने चाऱ्याचा मुद्दा बाजूला पडत आहे. परंतु, अनेक शेतकरी उपाशीपोटी असलेल्या जनावरांची कहाणी डोळ्यात पाणी येऊन सांगत आहेत.

आवाक्‍याबाहेरचे दर
जिल्ह्यात तब्बल वर्षभरापासून चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. चारा छावणीच्या माध्यमातून यावर तुटपुंजी उपाययोजना झाली. आता तर छावण्याही बंद झाल्या आहेत. जित्राब सांभाळण्यासाठी कडब्याची मागणी वाढत आहे. परंतु, जिल्ह्यातच कडबा उपलब्ध नसल्याने बाहेरच्या जिल्ह्यातून तो मागविला जात आहे. चारा छावण्या सुरू असताना 15 ते 20 रुपयांपर्यंत कडब्याची पेंढी विकली जात होती. आता हीच कडब्याची पेंढी 30 रुपयांवर पोचली आहे. शेतकऱ्यांच्या अवाक्‍याबाहेर कडब्याचे दर चालल्याने अनेकांची अडचण वाढली आहे.