चाराटंचाईमुळे नांदेडमध्ये जनावरांना प्लास्टिक खाण्याची वेळ

प्रमोद चौधरी
सोमवार, 15 मे 2017

आपल्या शेतात नगदी पीक म्हणून कपाशी व सोयाबीन घेतले जात आहे. बाहेरगावाहून चारा विक्री करून आणला जात आहे. परंतु त्यालाही मर्यादा येत असल्याने दुभत्या जनावरांना पुरेशा प्रमाणात चारा मिळत नसल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे. म्हणून, काही पशुपालक आपली जनावरे मोकाट सोडून देत आहेत.

नांदेड : जिल्ह्यात पाणीटंचाई उग्ररूप धारण करीत आहे. शहरातील काही प्रभागांत तसेच ग्रामीण भागांत सर्वच ठिकाणी एका हंडाभर पाण्यासाठी गावकोसापासून कोसो दूर जावे लागत आहे. याचा फटका जनावरांनाही बसत आहे. पाणी तर सोडाच चाराटंचाईमुळे जनावरांना कचऱ्यातील प्लास्टिकवर आपली भूक भागवावी लागत आहे.

पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील अनेक गावांत ग्रामस्थांसह मुक्‍या जनावरांनाही आपली तहान भागविण्यासाठी अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. त्यातच चाराटंचाईदेखील निर्माण झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी निर्माण झालेले आहे. याचा फटकाही जनावरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे गावे व शहरात रस्त्यालगतच्या भोजनालय व चहा टपरीजवळ पडलेले खरडे, प्लास्टिकच्या पिशव्यांतील शिळे अन्न, भाजीपाल्याच्या दांड्या दुभती जनावरेही खात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायही करतात. ज्यांच्याजवळ शेती नाही, तेही दुग्धव्यवसायातून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यामुळे पशुधन असलेल्यांची संख्याही मोठी आहे.

परंतु पावसाच्या असमतोलमुळे ज्वारीचे पीक व चारा निघणाऱ्या पिकांचे उत्पादन घटल्याने सर्वत्र चाराटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे आपल्या दुभत्या जनावरांना चारा म्हणून काय द्यावे, असा प्रश्‍नही पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.

पूर्वी शेतात निघणाऱ्या ज्वारीचा कडबा जनावरांना चारा म्हणून वापरला जात होता. परंतु बदलत्या काळात शेतात राबणारे सालगडीही आता ज्वारी न घेता रोखठोक पैशांची मागणी करीत असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेणेच बंद केलेले आहे.

शिवाय आता आपल्या शेतात नगदी पीक म्हणून कपाशी व सोयाबीन घेतले जात आहे. बाहेरगावाहून चारा विक्री करून आणला जात आहे. परंतु त्यालाही मर्यादा येत असल्याने दुभत्या जनावरांना पुरेशा प्रमाणात चारा मिळत नसल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे. म्हणून, काही पशुपालक आपली जनावरे मोकाट सोडून देत आहेत. ही जनावरे चाऱ्याच्या शोधात भटकताना जिल्ह्यातील शहरे व गावांमधील भोजनालये, चहाची टपरी, हॉटेल्स, बाजारपेठा आदी परिसरात फिरताना रस्त्यावर पडलेले खरडे, प्लास्टिकच्या पिशव्यांत भरलेले शिळे अन्न खात आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

यावर शासनाने तसेच स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया पशुपालकांनी 'सकाळ'कडे व्यक्त केल्या.