डॉक्‍टरांच्या संपामुळे खासगी आरोग्य सेवा ठप्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

बीड - निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई मागे घ्यावी व डॉक्‍टर संरक्षण कायदा अधिक कडक करावा या मागणीसाठी गुरुवारी (ता. 23) इंडियन मेडिकल असोसिएशनने संप पुकारला. संपाला होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, दंत, निमा आदी संघटनांनी पाठिंबा दिला. यामुळे जिल्ह्यातील खासगी आरोग्य सेवा पुरती ठप्प झाली. अत्यावश्‍यक सेवा मात्र सुरू होती. 

शासकीय सेवेतील डॉक्‍टरांना मारहाणीचे प्रकार वाढले आहेत. सरकार शासकीय डॉक्‍टरांना संरक्षण पुरवू शकत नसेल तर खासगी डॉक्‍टरांचे काय, असा सवाल संघटनेने केला. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे शासनाने त्यांच्यावर कारवाई केली. ही कारवाई मागे घ्यावी या मागणीसाठी गुरुवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने संप पुकारला. या संपाला जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांसह विविध वैद्यक संघटनांनी पाठिंबा दिला. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा ठप्प झाली. संपात साधारण दीड हजार डॉक्‍टर सहभागी झाल्याचा अंदाज आहे. दोनशेवर तज्ज्ञांचाही यामध्ये समावेश होता. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप खरवडकर, डॉ. पारखे, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. अनिल बारकुल, डॉ. हनुमंत पारखे, डॉ. सचिन देशमुख, डॉ. महादेव चिंचोले, डॉ. शेंडगे, डॉ. अशोक उनवणे, डॉ. विनीता ढाकणे, डॉ. घुगे आदींची उपस्थिती होती. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. 

डॉक्‍टर संरक्षण कायदा अजामीनपात्र करून त्याची कडक अंमलबजावणी करावी, या कायद्याअंतर्गत झालेल्या गुन्ह्यांमधील आरोपींवर तत्काळ कडक कारवाई केली तरच हल्ले करणाऱ्या समाज कंटकांवर जरब बसेल व डॉक्‍टरांवरील हल्ले थांबतील. 
- डॉ. दिलीप खरवडकर (अध्यक्ष, आयएमए, बीड)

Web Title: Due to the strike of doctors in private health services jam