नावातील सारखेपणाने ई प्रणालीत चुकाच चुका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

औरंगाबाद - राज्यातील पहिले संपूर्ण संगणकीकृत कार्यालय म्हणून येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) नोंद आहे. त्या दृष्टीने ऑनलाइन काम सुरू झाले आहे. मात्र, संगणकातील जुना डेटा ट्रान्स्फर करताना काही सारख्या नावामुळे गोंधळ आणि गमतीजमतीही झाल्या. संगणकाने याचे नाव; तर त्याची जन्मतारीख उचलली. यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. 

औरंगाबाद - राज्यातील पहिले संपूर्ण संगणकीकृत कार्यालय म्हणून येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) नोंद आहे. त्या दृष्टीने ऑनलाइन काम सुरू झाले आहे. मात्र, संगणकातील जुना डेटा ट्रान्स्फर करताना काही सारख्या नावामुळे गोंधळ आणि गमतीजमतीही झाल्या. संगणकाने याचे नाव; तर त्याची जन्मतारीख उचलली. यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. 

आरटीओने गेल्या वर्षभरापासून विविध उपाययोजना आखण्याचे काम सुरू केले आहे. वाहन परवान्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा म्हणून सुरवातीस परिवहन कार्यालयाने सारथी 1.0 ही प्रणाली सुरू केली होती. त्यात सुधारणा म्हणून सारथी 4.0 ही प्रणाली सुरू केली. त्यामुळे पूर्वीच्या सारथी 1.0 मधून सर्व कागदपत्रे सारथी 4.0 मध्ये बदल करण्यात आले. आता तर परिवहन कार्यालयाने ई-गव्हर्नन्सबरोबर करार केल्याने उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलच्या माध्यमाने फेब्रुवारीपासून शुल्क भरणाही ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आला. वाहन परवान्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, शुल्क भरणे, ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे ही कामे अपेक्षित आहेत. याशिवाय नागरिकांना इंटरनेट बॅंकिंग, डेबिट कार्ड वापरून एसबीआय, ई-पे यांद्वारे ऑनलाइन शुल्क भरणा करण्याची सुविधा www.parivahan.gov.in या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, हे करताना मोठी गडबड झाली. आरटीओ कार्यालयाने कार्यालयातील जुना संगणकीय डेटा असलेली हार्डडिक्‍स नवीन प्रणालीत टाकण्यासाठी "एनआयसी' या संगणकीय कामकाज करणाऱ्या शासनाच्या यंत्रणेकडे पाठवण्यात आली. 

"शेख'भाईंची उडाली झोप 
परिवहन कार्यालयाने दिलेल्या वाहन परवान्यांमध्ये "शेख' या आडनावाचे अनेक व्यक्ती आहेत, एवढेच नव्हे तर पहिले नाव, मधले नाव आणि शेवटचे नाव असलेलेही अनेकजण आहेत. संगणकाला डेटा ट्रान्स्फर करताना जन्मतारीख किंवा नावाचा सारखेपणा आढळल्याने संगणकाने अनेकांच्या नावांची सरमिसळ करून टाकली. एनआयसीने डेटा ट्रान्स्फर करून दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. यामध्ये मानवी चूक नाही. मात्र, नावातील साधर्म्यपणाने संगणकला न उमजलेली ही चूक आहे. आतापर्यंत चाळीस प्रकरणे समोर आली आहेत. या सर्व प्रकरणामध्ये नावात सारखेपणा, जन्मतारखेत सारखेपणा असल्याचे उघड झाले आहे. या संगणकीय गडबडीने अनेकांची नावे चुकली, अनेकांची जन्मतारीख चुकली, जसे जसे प्रकरण उघडकीस येत आहेत, त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

Web Title: E system errors in rto