शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे निधन

chiplunkar
chiplunkar

औरंगाबाद : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे मंगळवारी (ता. 18) सकाळी औरंगाबाद येथे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. राज्याचे शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झालेल्या चिपळूणकर यांनी राष्ट्रीय शिक्षण नियोजन प्रशासन संस्थेचे सल्लागार म्हणूनही अनेक वर्ष काम केलं. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी औरंगाबाद इथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

विद्याधर विष्णु उपाख्य वि. वि. चिपळूणकर यांचा जन्म 13 एप्रिल 1929 रोजी विर्ले पार्ले, मुंबई येथे झाला. त्यांनी 1976 ते 1986 या 10 वर्षांच्या कालावधीत राज्याचे शिक्षणसंचालक म्हणून काम पाहिले होते. गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले होते. वि. वि. चिपळूणकर यांनी माध्यमिक शिक्षक, शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षणसंचालक अशा विविध पदांवर काम केले होते. तसेच ते बालभारतीचे  माजी संचालक पण होते. बालभारतीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.

सेवानिवृत्तीनंतर ते औरंगाबादला स्थायिक झाले. आज 'चिपळूणकर समिती'च्या अहवालामुळे ते अनेकांना माहीत आहेत. त्यांच्या इतर अनेक योजना आणि त्यांनी केलेली अनेक कामे आजही गौरवाने सांगितली जातात. माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे यांनी सांगितले, की ग्रामिण भागातील बुद्धीमान विद्यार्थ्यांसाठी त्यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या पाठिंब्याने शासकीय विद्यानिकेतनांची संकल्पना साकारली. "उद्धरावा स्वये आत्मा" हे विद्यानिकेतनांचे ब्रीदवाक्य त्यांनीच सुचवले होते. मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तर सुधीर जोशी शिक्षणमंत्री होते. त्यावेळी, रात्र शाळांचे निकाल कमी लागतात, म्हणून त्या बंद कराव्यात, अशी शिक्षण क्षेत्रातील अनेकांची सूचना होती. त्यावर विचार करण्यासाठी नेमलेली समितीही तशीच शिफारस करण्याची शक्यता होती. मसुद्यावर चर्चा करताना चिपळूणकर म्हणाले, "दिवसभर कष्ट करून थकलेले, खिशात थोडा पैसा खुळखुळणारे हे तरुण तो चैनीसाठी, जुगारात, व्यसनात वाया न घालवता शाळेत येतात हे काय कमी महत्त्वाचे आहे? त्यांनी शाळेच्या परिसरात नुसती एक चक्कर जरी टाकली, तरी त्यांना बोर्डाने सर्टिफिकेट दिले पाहिजे." त्यामुळेच रात्रशाळा आजही सुरू आहेत.

"परीक्षांच्या किळसवाण्या चिखलात रुतलेले शिक्षणाच्या रथाचे चाक बाहेर काढण्यासाठी आपण आटापिटा करायला पाहिजे." असे ते म्हणायचे. त्याची सुरवात म्हणून 1977पासून इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये विद्यार्थ्यांना नापास करू नये, असे आदेश शासनाने काढले. 2001मध्ये शासनाने ते मागे घेतले.

नायगावला दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती आयोजित करायला 3 जानेवारी 1982पासून अनौपचारिकपणे सुरू झाली. 1996 पासून नायगावला शासन पातळीवर हा कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात झाली. 1982पासून नायगावला सुरवात केली ती वि. वि. चिपळूणकर सरांनी. त्या वेळी खंडाळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शंकरराव गाढवे यांची मदत घेतली. चिपळूणकर सर सेवानिवृत्तीनंतरही 1996पर्यंत दरवर्षी 3 जानेवारीला नायगावला जात असत, अशी आठवणही काळपांडे यांनी नमूद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com