जिल्ह्यातील आठ शहरांमध्ये होणार अंडरग्राउंड वीजजोडणी 

mseb
mseb

उस्मानाबाद - लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील आठही नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात वीजजोडण्या अंडरग्राउंड करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. 

शहरी भाग म्हटले की रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वीज वाहक तारा दिसून येतात. वस्त्यांमध्ये तर वीज तारांची यापेक्षाही दुरवस्था असते. इमारतीवरूनच वीज तारा हाताशी येतात. यातून अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातील विविध भागांत लोंबकळणाऱ्या तारा मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अनेक ठिकाणी खांब वाकलेल्या स्थितीत असतात. काही ठिकाणी झाडातून जाणाऱ्या तारा आढळून येतात. शहरी भागात यामुळे जीवितहानी होण्याचा धोका असतो. जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, मुरूम, उमरगा, कळंब, भूम, परंडा या आठ शहरांतील हे चित्र आता बदलणार आहे. केंद्र शासनाने एकात्मिक ऊर्जा विकास योजनेच्या माध्यमातून सर्व वीजवाहक तारा आता जमिनीतून सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे लोंबकळणाऱ्या तारांचे चित्र आता पडद्याआड जाणार आहे; तसेच त्यातून होणारे अपघातही रोखता येणार आहेत. पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानंतर वीज गायब होण्याचे प्रकार वारंवार घडतात. अनेक दिवस वीज गायब होते; तसेच रात्री-अपरात्रीही विजेचा लपंडाव सुरू असतो. अशा घटनांना यामुळे पायबंद बसणार आहे. 

65 कोटी रुपयांचा निधी मंजूर 
केंद्र शासनाने या योजनेसाठी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंबंधीची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्यक्ष कामाला सुरवात झाल्यानंतर एका वर्षात काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत शहरातील वीज वितरणाचे चित्र बदललेले दिसणार आहे. जिल्ह्यात एप्रिल 2016 ते डिसेंबर 2016 पर्यंत एक हजार 447 वीजचोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यांना 62 लाख 49 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. यापैकी 26 लाख 16 हजार रुपयांची रक्कम वसूल झालेली आहे. 

जिल्ह्यात येत्या दोन वर्षांत ही योजना कार्यान्वित होईल. टेंडर प्रक्रिया सुरू असून काम सुरू झाल्यापासून एका वर्षात काम पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे शहरी भागाचे चित्र लवकरच पालटणार आहे. 
- प्रकाश पवणीकर, अधीक्षक अभियंता, उस्मानाबाद. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com