छोट्या महापालिकेत थेट जनतेतून महापौर ; मुख्यमंत्र्यांचे महापौर परिषदेत आश्‍वासन 

माधव इतबारे 
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

औरंगाबाद शहरात दोन दिवसीय अखिल भारतीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, ''राज्यातील बहुतांश महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत. मात्र आगामी काळात छोट्या म्हणजेच 'क' व 'ड' दर्जाच्या महापालिकांमध्ये थेट जनतेतून महापौर निवडण्यासाठी शासन अभ्यासपूर्ण निर्णय घेईल

औरंगाबाद : राज्यातील 'क' व 'ड' दर्जाच्या महानगरपालिकांमध्ये थेट जनतेतून महापौर निवडण्यासाठी राज्य सरकार लवकरच अभ्यासपूर्ण निर्णय घेईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. नऊ) दिले. 

औरंगाबाद शहरात दोन दिवसीय अखिल भारतीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, ''राज्यातील बहुतांश महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत. मात्र आगामी काळात छोट्या म्हणजेच 'क' व 'ड' दर्जाच्या महापालिकांमध्ये थेट जनतेतून महापौर निवडण्यासाठी शासन अभ्यासपूर्ण निर्णय घेईल. महापौरांना प्रशासकीय, आर्थिक अधिकार देण्यात यावेत या मागणीचा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले, अधिकार वाढले पाहिजेत यासाठी प्रयत्न करू, मात्र सध्या असलेले अधिकार कमी नाहीत. अनेकांना आपल्या अधिकाराची जाणीव देखील नसते. योग्य नियोजन असेल, पारदर्शक कारभार असेल तर जगभरातील अनेक कंपन्या शहरी भागात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. त्यामुळे निधी कमी पडणार नाही, मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी. महापालिकांना करातून उत्पन्न मिळालेच पाहिजे, सार्वजनिक वाहतूक, पाणी पुरवठा, स्वच्छता, करवसुली यामध्ये महापालिका मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू शकतात. या परिषदेत यासर्व बाबींवर विचार विनिमय होईल, अशी अपेक्षा आहे''.

व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, आमदार सतीश चव्हाण, इम्तियाज जलील, मध्यप्रदेशचे मंत्री उमाशंकर गुप्ता, महापौर परिषदेचे अध्यक्ष विवेक शेजवलकर, आमदार अनिल सोले, महापौर भगवान घडामोडे, उपमहापौर स्मिता घोगरे यांच्यासह महापालिका पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

Web Title: esakal news aurangabad news devendra fadanvis spoke about mayor election