कर्मचारी निवासावर कोसळल्या जलकुंभाच्या पायऱ्या ; तीन जण थोडक्यात बचावले 

माधव इतबारे 
शनिवार, 1 जुलै 2017

पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावर जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीच्या पायऱ्याचा स्लॅब कोसळल्याची घटना सिडको एन-7 भागात सकाळी सहा वाजता घडली. त्यात सुदैवाने तीन जण बालंबाल बचावले. दरम्यान आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी टाकीची पाहणी करून कर्मचारी निवासस्थान तातडीने रिकामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

औरंगाबाद - पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावर जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीच्या पायऱ्याचा स्लॅब कोसळल्याची घटना सिडको एन-7 भागात सकाळी सहा वाजता घडली. त्यात सुदैवाने तीन जण बालंबाल बचावले. दरम्यान आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी टाकीची पाहणी करून कर्मचारी निवासस्थान तातडीने रिकामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
 
सिडको एन-7 येथे सिडको-हडको भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी सिडको प्रशासनाने तीन पाण्याच्या टाक्‍या बांधल्या आहेत. त्यातील 11 लाख लिटर क्षमतेची टाकी अत्यंत जीर्ण झाली आहे. याच पाण्याच्या टाकीलगत कर्मचाऱ्यांसाठी दोन खोल्या असून, त्यात संजय गोकूळ जेजूरकर, मोहन चांदोरे हे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी कुटुंबासह गेल्या पंधरा वर्षांपासून राहतात. पहाटे जेजूरकर व चांदोरे हे दोघे कामावर गेले. जेजूरकर यांच्या घरात चार जण तर चांदोरे यांच्या घरात तीन जण होते. सकाळी सहा वाजेच्या सुमारास पायऱ्यांचा स्लॅब या पत्र्याच्या निवासस्थानावर कोसळला. यावेळी मोठा आवाज झाला व पत्रा वाकून स्लॅबचा मोठा भाग जेजूरकर यांच्या घरात पडला. त्या लगतच रितीका जेजूरकर, सार्थक व नीराबाई या वृद्धा झोपलेल्या होत्या. सुदैवाने हे तिघे बालंबाल बचावले.