तेंदूपत्ता मजूर ऐन दिवाळीत बोनसपासून वंचित 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या गावांमधील तेंदुपत्ता लिलावाद्वारे ठेकेदारामार्फत गोळा करण्यात येतो. संबंधित मजुरांना शासनाच्या नियमाप्रमाणे बोनस दिला जातो. प्रचलित पद्धतीनुसार पारदर्शकता राहावी या करिता मजुरांना बोनस हा ऑनलाईन पद्धतीने आरटीजीएसद्वारे देण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे.

अजिंठा : खुल्लोड (ता. सिल्लोड) येथील मजुरांना वनविभागाकडून मिळणारे तेंदूपत्याचे 2016-17 या आर्थिक वर्षाचे बोनस अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे बोनस त्वरित मिळावा यासाठी येथील मजूर अजिंठा वनपरिक्षेत्र कार्यालयात खेट्या मारताना दिसून येत आहेत. 

वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या गावांमधील तेंदुपत्ता लिलावाद्वारे ठेकेदारामार्फत गोळा करण्यात येतो. संबंधित मजुरांना शासनाच्या नियमाप्रमाणे बोनस दिला जातो. प्रचलित पद्धतीनुसार पारदर्शकता राहावी या करिता मजुरांना बोनस हा ऑनलाईन पद्धतीने आरटीजीएसद्वारे देण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे. या अनुषंगाने वनविभागातर्फे संबंधित लाभार्थ्यांचे नावे, गाव, बॅंकेचे नाव, बॅंक खाते क्रमांक आदी कागदपत्रांची पूर्तता करूनदेखील बॅंकेच्या उदासीनतेमुळे अद्यापही तेंदुपत्याचे बोनस न मिळाल्याचे येथील तुकाराम नारायण सपकाळ, रावसाहेब वाघ, नाना सपकाळ, भागवत दहीकर, नारायण दहीकर आदींचे म्हणणे आहे. 

या विषयी अजिंठा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. मांगदरे यांच्याशी संपर्क साधला असता मी या तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या लाभार्थ्यांच्या मजुरीपाठोपाठ मिळणाऱ्या बोनससंदर्भात सर्व बाबींची पूर्तता केली आहे. बॅंकेकडून लवकरच बोनस ऑनलाइन पद्धतीने संबंधितांच्या खात्यावर जमा होतील, असे त्यांनी सांगितले. ऐन दिवाळी सणाला मजुरांना या बोनसपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अजिंठा वनपरिक्षेत्रातील अजिंठ्यासह बाळापूर, नाटवी, खुल्लोड, हळदा, वसई, देव्हारी, जामठी आदी गावांमधून तेंदुपत्ता गोळा करण्यात येतो. येथील मजूरदेखील या बोनसपासून वंचित आहेत. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित खात्यावर बोनस जमा करावा, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. 
 

टॅग्स