वाळूजमध्ये पकडल्या पाच लाखांच्या जुन्या नोटा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

केंद्र सरकारने चलनासंबंधी केलेल्या नवीन कायद्यानुसार अशा प्रकारची राज्यातील पहिली कारवाई आहे. त्यामुळेच संशयित इम्तियाजवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. याबाबत प्राप्तिकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. 
-ज्ञानेश्वर साबळे, पोलिस निरीक्षक, वाळूज. 

औरंगाबाद / वाळूज : चलनातून बाद झालेल्या 500 रुपयांच्या चार लाख 96 हजारांच्या नोटांसह जालन्याच्या एका हमालाला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी (ता. 14) सकाळी पंढरपूर येथील ओऍसिस चौकात करण्यात आली. जप्त नोटा जालन्याच्या एका व्यापाऱ्याच्या असून, त्या हमालामार्फत वाळूज येथे एका व्यक्तीला दिल्या जाणार होत्या. इम्तियाजखान अन्वरखान (रा. काबाडी मोहल्ला, खडकपुरा, जालना) असे संशयित हमालाचे नाव आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी वाळूजला येणार असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाला मिळाली होती. या पथकाने पंढरपूर येथील ओऍसिस चौकात सापळा रचून संशयाआधारे इम्तियाजखान अन्वरखान याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बॅगेत 500 रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या तब्बल 4 लाख 96 हजार रुपये किमतीच्या जुन्या 992 नोटा आढळून आल्या. या नोटा जालन्याच्या व्यापाऱ्याच्या असून, त्यानेच आपल्याला औरंगाबादेत पाठवले होते. वाळूजच्या ओऍसिस चौकात एक व्यक्ती या नोटा घेण्यासाठी येणार होती; पण कारवाईची चाहूल लागल्यानंतर ती आलीच नसल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हमालाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव, उपायुक्‍त विनायक ढाकणे, सहायक पोलिस आयुक्‍त ज्ञानोबा मुंढे व पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख, कारभारी देवरे, वसंत शेळके, बंडू गोरे, प्रकाश गायकवाड, संतोष जाधव, मनमोहन मुरली कोलिमी, सुधीर सोनवणे यांच्या पथकाने केली. 

 

टॅग्स