मराठवाड्याच्या मनाचा मोठेपणा आयुष्यभर विसरणार नाही - शरद पवार

राजेभाऊ मोगल 
रविवार, 30 जुलै 2017

औरंगाबाद - मला तिकीट देऊ नये, असा ठराव असतानाही यशवंतराव चव्हाण, येथील विनायकराव पाटील यांच्या पाठबळामुळेच मी, सर्वप्रथम विधानसभेत पोहचलो, समाजकारणात उभा राहीलो. यासह अनेक महत्वाच्या बाबींमध्ये मराठवाड्याने दाखविलेला मनाचा मोठेपणा आयुष्यभर विसरणार नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्‍त केली. 

औरंगाबाद - मला तिकीट देऊ नये, असा ठराव असतानाही यशवंतराव चव्हाण, येथील विनायकराव पाटील यांच्या पाठबळामुळेच मी, सर्वप्रथम विधानसभेत पोहचलो, समाजकारणात उभा राहीलो. यासह अनेक महत्वाच्या बाबींमध्ये मराठवाड्याने दाखविलेला मनाचा मोठेपणा आयुष्यभर विसरणार नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्‍त केली. 

संसदीय कारकिर्दीस पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खासदार पवार यांचा शनिवारी (ता. 29) देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर केंद्रीय मार्ग परिवहन व महामार्ग व नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सर्व पक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले, अनेकांनी आपापल्या भाषणात माझ्यातील गुण सांगीतले. ते ऐकून माझ्यात काय गुण आहेत, काय नाहीत हे समजले. मी, 1967 साली कॉंग्रेसकडून तिकीट मागीतले. मात्र, मला सोडून अन्य कुणालाही ते द्यावे, असा ठरावच पुणे कॉंग्रेस कमिटीने घेतला होता. मात्र, यशवंतराव चव्हाण, विनायकराव पाटील यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवत सर्वप्रथम विधानसभेत पाठविले. तेथूनच माझ्या समाजकार्याला सुरवात झाली. तसेच किल्लारीत भुंकप झाल्यानंतर आपल्या घरातील संकट समजून येथील जनतेनी भक्‍कमपणे पाठबळ दिले. मराठवाड्याच्या मनाचा हा मोठेपणा आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. अशा शब्दांत श्री. पवार यांनी भावना व्यक्‍त केल्या.

तत्पूर्वी शारदाबाई गोविंदराव पवार विद्यार्थीनी वसतीगृहाचे उदघाटनही श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर म्हणाले, श्री. पवार हे निष्णात अनुभवी नेते असून सामान्याच्या व्यथा समजवून घेत त्या सोडविण्याचे काम त्यांनी केले.'' याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे यांनीही मनोगत व्यक्‍त केले.

यावेळी मंचावर संयोजक आमदार सतीश चव्हाण, नंदकिशोर कागलीवाल, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे, डॉ. पद्मसिंह पाटील, न्या. बी. एन. देशमुख, न्या. नरेंद्र चपळगावकर, माजी मंत्री कमलकिशोर कदम, राजेश टोपे, मधुकरराव चव्हाण, जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, महापौर भगवान घडामोडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगावकर, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, आमदार अमरसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, आमदार संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार बाबाजानी दूर्राणी, खासदार संजय जाधव, माजी खासदार गणेशराव दुधगावकर, आमदार अतुल सावे, डॉ. कल्याण काळे, अभिजित देशमुख, प्रदीप जैस्वाल, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

हेलीकॉप्टरला रस्ता दाखवताच पायलट आंचबित 
हवाई प्रवास करताना अनेकदा हेलीकॉप्टरच्या पायलटास स्थळ सापडत नसे. हा प्रकार माझ्या लक्षात येताच त्यास, डाव्या हाताला घे, नदी लागेल, त्याच्या पलीकडे एक गाव दिसेल, त्याच्या पलीकडे आपल्याला उतरायचे, असे मी सांगत असे. हे ऐकून तो अंचबित व्हायचा. मात्र, हे राज्यात खुप फिरण्याची संधी मिळाल्यानेच शक्‍य झाल्याचेही श्री. पवार यांनी नमुद केले. 

शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत अखंड चर्चा कशासाठी ? 
केंद्र सरकारने नुकतेच उद्योगपती, व्यापाऱ्यांसह अन्य घटकांचे 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या 34 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीसाठी अखंड चर्चा कशासाठी ?, असा सवाल खासदार पवार यांनी उपस्थित केला. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी करू, असे सांगता. मग महाराष्ट्राने काय तुमचे घोडे मारले.? शेतकरी भीक मागत नाहीत. जोपर्यंत येथील शेतकऱ्यांच्या डोक्‍यावरील कर्जाचे ओझे बाजूला सरत नाही. तोपर्यंत त्याला ताकद देण्याचे काम करायला हवे. शेतकऱ्यांत बाजारात जाण्याची ताकद निर्माण करण्याची गरज असून त्यातूनच आपली आर्थिक स्थिती सुधारेल. शेतकरी गेला तरी देणे विसरत नाही, अशी शेतकऱ्यांची जात आहे, हे देखील त्यांनी ठणकावून सांगीतले. शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळायला हवी. कांदे महाग झाले की दिल्लीतील महिलांच्या डोळ्यात पाणी येते, असे चित्र माध्यमातून पुढे येते. मात्र, जेंव्हा कांद्याला कुत्रही विचारत नाही, तेंव्हा ही मंडळी कुठे असते, कांदाचा भाव वाढला की देशावर संकट आल्याची ओरड बरी नाही, अशी तिरकस टिकाही त्यांनी केली. 

पवारांच्या निर्णयांचा केंद्रबिदू गरीब माणुसच - नितीन गडकरी 
विरोधी पक्षातील लोकांनाही सन्मान देण्याचे काम श्री. पवारांनी केले. काही लोक एखाद्या पदावर गेले की त्या पदाची प्रतिष्ठा वाढते, त्यापैकी ते आहेत. त्यांच्या निर्णयाचा केंद्रबिंदु हा गरीब माणुस राहीला आहे. सर्वपक्षात मैत्रीचे संबंध जोपासणारे ते एकमेव आहेत. यातूनच महाराष्ट्राचे राजकारण हे परीपक्‍वतेचे प्रतिक असल्याचे स्पष्ट होते. त्यांनी अनेकांचे होत्याचे नव्हते केलेले असल्याचेही त्यांनी नमुद केले. त्यांचे निर्णय हे लोकाभिमुख आहेत. त्यांच्या चिंतनशील विकासाभिमुख वृत्तीतून गरीबांचे हित साधले आहे. पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांशीदेखील त्यांचे चांगले संबध असून माणसे जपण्याची त्यांच्याकडे कला आहे.