गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मितीस परवानगीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - शेतमालाला आतापर्यंत उत्पादन खर्चावर आधारित भाव तर मिळालाच नाही, सरकार किंवा शास्त्रज्ञही केवळ अधिक उत्पादन काढण्यावरच भर देतात; परंतु केवळ शेतमाल उत्पादनच नाही तर गोड ज्वारी, मका, बीट यासारख्या शेतमालापासून (इथेनॉल) इंधन निर्मिती केल्यास देशातला पैसा बाहेर जाणार नाही. तसेच शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असे मत जैव इंधन शेतकरी संघटनेचे शामराव देसाई यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. 

तब्बल वीस फूट वाढणारे गोड ज्वारीचे पीक वर्षाकाठी तीनदा घेता येते. मुळापासून शेंड्यापर्यंत गोड असलेल्या या पिकापासून उसाच्या तुलनेत जास्त साखर तयार होऊ शकत नसली तरी एक टन गोड ज्वारीपासून ५५ लिटर इथेनॉल मिळते. असे एकरी २५ टन गोड ज्वारीपासून होणारे एकूण इथेनॉल प्रतिलिटर ४८.५० भाव याप्रमाणे ६६ हजार रुपयांचे इथेनॉल, तर शिल्लक राहिलेल्या २५० ते ३०० किलो चिपाड (बगॅस) चे सात हजार रुपये होतात. याला खर्च प्रतिटन केवळ एक हजार ते बाराशे रुपये होतो. सर्व शेतमालापासून इथेनॉल, तर सर्व प्रकारच्या बियांपासून बायोडिझेल होते. बायोडिझेल वापराने वायूप्रदूषण होत नाही उलट ते पुनर्निमित आहे. खनिज संपत्ती ही मर्यादित स्वरूपाची आहे, मात्र बायोडिझेलचे तसे नाही. सर्व विद्यापीठांत या गोड ज्वारीचे बियाणे उपलब्ध आहे; परंतु हे पेरून शेतकरी काय करणार? यासाठी २०१६-२०१७ च्या हंगामात गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मितीचे धोरण जाहीर करून इथेनॉल निर्मितीचे कारखाने काढण्यास परवानगी देण्याचे निवेदनही पंतप्रधान कार्यालयाला दिल्याचे श्री. देसाई म्हणाले. 

मराठवाड्याचा दौरा करणार 
इथेनॉल निर्मितीची ही भूमिका आपण २००५ पासून मांडत आलो आहोत. यंदा मराठवाड्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या इथेनॉल निर्मितीसाठी आपण साधारणतः २२ ऑक्‍टोबरनंतर मराठवाडा दौरा करणार असल्याचे श्री. देसाई (कापशी, जि. कोल्हापूर) यांनी सांगितले.