टॅंकर मालकाच्या मेहनतीवर कंत्राटदाराने फेरले पाणी 

टॅंकर मालकाच्या मेहनतीवर कंत्राटदाराने फेरले पाणी 

औरंगाबाद - वॉटर युटिलिटी कंपनीसोबत पाण्याचा करार करणाऱ्या गोल्ड कन्स्ट्रक्‍शनच्या कंत्राटदाराने टॅंकरमालकाचे दहा लाख 62 हजार आठशे ऐंशी रुपये बुडवले. त्यांच्या मेहनतीवरच पाणी फेरल्यामुळे टॅंकरमालकाने सिडको ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणात कंत्राटदार, त्याचे वडील व व्यवस्थापकाविरुद्ध बुधवारी (ता. 30) मध्यरात्री फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. 

योगेश सुभाष मोटे (वय 28, रा. श्रीकृष्णनगर, शहानूरमियॉं दर्गा परिसर) असे फसगत झालेल्या टॅंकरमालकाचे नाव आहे. त्यांच्यासोबत अन्य काही टॅंकरमालकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेने वॉटर युटिलिटी कंपनीसोबत पाणीपुरवठ्याचा 2014 ला करार केला. यात गोल्ड कन्स्ट्रक्‍शन कंपनीचा शेख अक्रम शेख अन्वर (रा. टाऊन हॉल) याला ठेकेदार म्हणून नेमले होते. तेव्हापासून मोटे यांचे चार टॅंकर पाणीपुरवठ्यासाठी भाडेतत्वावर शेख अक्रमकडे लावले. प्रत्येक टॅंकरच्या फेरीपोटी 280 रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर 2016 पासून अक्रमने फेरीपोटी तीनशे रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु करार करण्याऐवजी विश्‍वास ठेवा, कुपन पद्धतीनुसार पैसे देऊ असे त्याने मोटे यांना सांगितले. ही कुपन सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने छापलेली असून त्यावर कंपनीचा होलोग्राम आहे. जानेवारी 2016 पासून पाण्याच्या बिलातून त्याने परस्पर दोन लाख 27 हजार रुपये कापून घेतले. ही रक्कम युटिलिटी कंपनीने कपात केल्याचेही त्याने सांगितले. त्याने 2016 पासून मागणी करूनही मोटेसह काही टॅंकरधारकांचे बिल दिले नाही. बिलाचे थकीत पैसे न मिळाल्याने मोटे यांनी अक्रमचे वडील शेख अन्वर यांना ही बाब सांगितली. पण त्यांनी टॅंकर बंद करा व बिलाची रक्कम देऊन टाकू, असे कोरडे आश्‍वासन दिले. त्यानुसार, चार हजार 881 कुपन दिल्यानंतरही पैसे त्यांनी अद्याप दिले नाहीत. या प्रकरणात मोटे यांनी तक्रार दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी तपास केल्यानंतर फसगत झाल्याचे स्पष्ट झाले. 

सीडीसह दिली तक्रार 
एकूण कुपननुसार, तेरा लाख 63 हजार 880 रुपयांपैकी दहा लाख 62 हजार 880 रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे मोटे यांनी अक्रमचा व्यवस्थापक सय्यद अबुझरशी संपर्क साधला. पण साहेब काही ऐकत नाहीत असे सांगून मोटे यांना टोलवले जात होते. यासंबंधीचे रेकॉर्डिंग सीडीद्वारे तयार करून त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com