बनावट नोटांची पोलिसांनीच केली "केस स्टडी'! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

औरंगाबाद - बनावट नोटा छपाईच्या प्रकरणात अटक झालेल्या माजीद खानला गुन्हेशाखेच्या पोलिसांनी खबऱ्यामार्फत पाच हजार रुपये दिले, त्यानंतर दहा हजारांच्या बनावट नोटांचे सॅम्पल घेतले, आयुक्तांना दाखवले, नोटा बनावट असल्याचे स्पष्ट होताच, आयुक्तांनी निर्देश दिले अन्‌ छापा पडला. पोलिसांनी केलेल्या केस स्टडीमुळे शहरातील नोटा छपाईचा कारखाना उद्‌ध्वस्त झाला. 

औरंगाबाद - बनावट नोटा छपाईच्या प्रकरणात अटक झालेल्या माजीद खानला गुन्हेशाखेच्या पोलिसांनी खबऱ्यामार्फत पाच हजार रुपये दिले, त्यानंतर दहा हजारांच्या बनावट नोटांचे सॅम्पल घेतले, आयुक्तांना दाखवले, नोटा बनावट असल्याचे स्पष्ट होताच, आयुक्तांनी निर्देश दिले अन्‌ छापा पडला. पोलिसांनी केलेल्या केस स्टडीमुळे शहरातील नोटा छपाईचा कारखाना उद्‌ध्वस्त झाला. 

शहरात बनावट नोटांचा छपाई कारखाना सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यामुळे पोलिसांनी केस स्टडी सुरू केली. यापूर्वी कुणावर छपाई प्रकरणात गुन्हा नोंद आहे, याची माहिती घेतली. पोलिसांचा माजीद खानवर पूर्वीपासूनच संशय होता. त्यातच एका खबऱ्याने त्याने बनावट नोटा तयार करण्याचा कारखानाच सुरू केला, अशी बाब गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना कळवली. बनावट नोटा छापण्याच्या प्रकाराची चाचपणी करण्यासाठी पोलिसांनी खबऱ्यामार्फतच माजीद खानशी खऱ्या नोटांच्या किमतीत दुप्पट बनावट नोटा देण्याचा व्यवहार केला. यानंतर खबऱ्याने खरे पाच हजार रुपये दिले व दहा हजारांच्या बनावट नोटा माजीदने दिल्या. या नोटांचे सॅम्पल पोलिसांनी आयुक्त यशस्वी यादव यांना दाखवले. नोटा बनावट असल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी शुक्रवारी (ता. 18) रात्री अकरानंतर माजीद खानच्या किराडपुरा, बायजीपुरा भागात सापळा रचला. त्यानंतर घरात छापा घालून त्याला अटक केली. 

मोठ्या ऑर्डरमध्येच अडकला.. 
पहिल्यावेळी पाच हजार मिळाल्यानंतर खबऱ्याने माजीद खानला आणखी मोठी ऑडर देतो, असे आमिष दाखवले होते. त्यामुळे ऑर्डरसाठीच्या नोटा तयार करण्यातच माजीद खान गुंतला होता. त्यामुळे आधी तयार केलेल्या नोटा खपवण्यासाठी त्याला वेळच मिळाला नाही. 

एकला चलो रे.. 
पोलिसांच्या हाती लागू नये, अथवा आपले बिंग फुटू नये म्हणून माजीद खान एकटाच नोटा छपाई करत होता. खास करून रात्री त्याचा "उद्योग' चालत होता. एकटाच असल्याची संधी साधून पोलिसांनी रात्री छापा टाकला व तब्बल बनावट पाच लाख रुपये जप्त केले. 

खऱ्या नोटा ठरणार पुरावा.. 
पोलिसांनी बनावट नोटा खरेदीवेळी पाच हजार रुपये खरे दिले होते; परंतु त्यांनी नोटांचे क्रमांक लिहून घेतले होते. पोलिसांनी घातलेल्या छाप्यात त्यांनीच दिलेल्या खऱ्या नोटाही जप्त केल्या. त्यामुळे या नोटा त्याच्याविरुद्ध प्रबळ पुरावा म्हणून पोलिसांसाठी कामाला येणार असल्याची बाब सूत्रांनी सांगितली.