पावणेदोन लाख क्विंटल तूर मार्केट यार्डात पडून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

बीड - यार्डात नोंदविलेली सर्व तूर खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली, तरी शेतकऱ्यांसाठी मात्र हमी केंद्रावर तूर विकणे अग्निदिव्यच ठरणार आहे. आजघडीला जिल्ह्यातील ११ खरेदी केंद्रांच्या यार्डात तब्बल पावणेदोन लाख क्विंटल तूर मापाच्या प्रतीक्षेत पडून आहे; मात्र तूर खरेदीसाठी बारदाना उपलब्ध व्हायला तयार नाही. आजच्या तारखेत मार्केटिंग फेडरेशनकडे केवळ १२ हजार पोती म्हणजे ६ हजार क्विंटलचाच बारदाना शिल्लक आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी नेमकी केव्हा होणार, हाच प्रश्‍न आहे. 

बीड जिल्ह्यात अकरा बाजार समित्यांच्या यार्डात तूर खरेदी २० डिसेंबरपासून सुरू करण्यात आली; मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुरीची आवकच नव्हती. त्यानंतर खऱ्या अर्थाने आवक वाढली, तरी बारदानाच उपलब्ध होत नसल्याने तब्ब्ल ३५ दिवस तूर खरेदी बंद होती. त्यातच २२ एप्रिलनंतर तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय ‘नाफेड’ने घेतला आहे. त्या तारखेपर्यंत यार्डात नोंदविली गेलेली सर्व तूर खरेदी केली जाईल, असे सरकार सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र बारदान्याची उपलब्धता, काट्यांची संख्या यांचा मेळ घातला तर सर्व तुरीची मापे होण्यास जून महिना उजाडेल असेच चित्र आहे. 

जिल्ह्यात आजघडीला पावणेदोन लाख क्विंटल तूर यार्डामध्ये पडून आहे. यात सर्वाधिक ३५ हजार क्विंटल गेवराईत, तर २५ हजार क्विंटल तूर माजलगावात आहे. बीड आणि परळीत प्रत्येकी १५ हजार क्विंटल तुरीला मापाची प्रतीक्षा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तूर मापाच्या प्रतीक्षेत असली तरी त्या तुलनेत बारदाना उपलब्ध करून देण्यात मात्र नाफेड कमी पडत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात १२ हजार पोती उपलब्ध करून देण्यात आली; मात्र यात केवळ ६ हजार क्विंटल तूरच खरेदी करता येईल. पुढच्या खरेदीसाठी बारदाना कधी येणार आणि खरेदी कधी होणार, हा प्रश्‍न आहे. त्यातच प्रत्येक खरेदी केंद्रावर फार तर तीन ते चार काटे आहेत. ते पूर्ण क्षमतेने वापरले तरी दिवसाला १५०० क्विंटलपेक्षा जास्त खरेदी होऊ शकत नाही. जिल्ह्यातील एकूण ११ केंद्रांवरची खरेदी १५ हजार क्विंटलच्या आसपास जाईल.

पैसे केवळ दोन लाख क्विंटलचे 
जिल्ह्यातील ११ केंद्रांवरून आजपर्यंत सव्वातीन लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. यात बीड ७८ हजार, माजलगाव ५९ हजार, गेवराई ४६ हजार, कडा ३४ हजार, शिरूर २१ हजार, पाटोदा २० हजार, परळी १८ हजार, वडवणी, धारूर प्रत्येकी १६ हजार, केज १२ हजार, अंबाजोगाई ७ हजार क्विंटल अशी तूर खरेदी झाली आहे. यातील २ लाख क्विंटलचे तब्बल १ अब्ज रुपये मार्केटिंग फेडरेशनला ‘नाफेड’कडून मिळाले असून त्याचे वाटप शेतकऱ्यांना होत आहे.

टॅग्स