उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

उमरी - मागील काही दिवसांपासून तापमान सातत्याने 41 ते 42 अंशांपर्यंत जात आहे. वाढत्या उन्हामुळे नांदेडच्या उमरी तालुक्‍यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील उष्माघाताचा या वर्षीचा हा दुसरा बळी आहे. यापूर्वी मागील महिन्यात किनवट तालुक्‍यात एकाचा मृत्यू झाला आहे. उमरी तालुक्‍यातील महाटी येथील अल्पभूधारक शेतकरी गोपाळ लक्ष्मण देवकर शनिवारी दुपारी शेतातील कापसाच्या पराट्या काढत होते. दुपारी जेवण करून पाणी पित असताना त्यांना चक्कर आली.

शेजारच्या शेतातील शेतकऱ्यांनी त्यांना लगेच उमरी ग्रामीण रुग्णालय प्राथमिक उपचार करून नांदेड येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.