उस्मानाबाद: सात हजार ३९३ शेतकरी पैसे भरून वीजजोडणीपासून वंचित

Mahavitran
Mahavitran

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सात हजार ३९३ शेतकरी पैसे भरून वीजजोडणीपासून वंचित राहिले आहेत. गेल्या वर्षभरात केवळ ५०२ शेतकऱ्यांनाच वीजजोडणी देण्यात आली आहे. 

गेल्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रब्बी पिकांना पाणी देता आले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी वीजजोडणीसाठी मागणी करीत आहेत. २०१७ मध्ये चार हजार ७१ शेतकऱ्यांना पैसे भरूनही वीजजोडणी मिळाली नव्हती. त्यानंतर यामध्ये वाढ झाली. यंदा मार्चअखेर उस्मानाबाद विभागात चार हजार ८६२ तर तुळजापूर विभागातील दोन हजार ५३१ शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी पैसे भरलेले आहेत. मात्र अद्यापही त्यांना जोडणी मिळालेली नाही. यामध्ये तुळजापूर एक हजार ४६१, परंडा एक हजार १०९, कळंब एक हजार ३०, उस्मानाबाद शहर १०, उस्मानाबाद ग्रामीण ४९९, तेर ८६८, भूम ६६५, वाशी ६८१, उमरगा ३७५ तर लोहारा तालुक्यातील ६९५ शेतकरी पैसे भरूनही वीजजोडणीपासून वंचित आहेत. 

सात वर्षांपासून जोडणी मिळेना 
जिल्ह्यात वीजचोरी कमी करण्यासाठी शासनाने २०१० ते २०१३ या वर्षात वीजजोडणीची विशेष मोहीम राबविली होती. यामध्ये पैसे भरताच जोडणी दिली जात होती. मात्र त्यांना खांब, वायर उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र जिल्ह्यात तीन हजारांपेक्षा जास्त शेतकरी खांब-तारांच्या प्रतीक्षेत आहेत. खांब, तारा नसल्याने शेतकऱ्यांनी स्वतः केबल विकत घेऊन जोडणी घेतली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज मिळत नाही. केबल चोरीला जाण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे असे शेतकरी वीजजोडणी देण्याची मागणी करीत आहेत. 

अपुरी वीज अन साहित्यही 
वीजजोडणी देण्यासाठी मुळातच विजेची कमतरता जाणवत आहे. त्यातच शेतकऱ्यांना खांब, वायरिंगसह जोडणी देण्यासाठी आवश्‍यक निधी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पैसे घेऊनही वेळेवर वीजजोडणी देता येत नसल्याचे अधिकारी खासगीमध्ये बोलत आहेत. वीज जोडणीची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने शेतकरीही हताश होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com