शेतकऱ्याच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

पूर्णा - पांगरा ढोणे येथील अल्पभूधारक शेतकरी तुकाराम ढोणे यांचे कर्जमाफीसाठी कोरड्या विहिरीतील बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशी शनिवारीही सुरू होते. या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून, आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे शेतकऱ्यांसह रविवारी (ता. 26) उपोषणस्थळी धरणे आंदोलन करणार आहेत.

ढोणे यांनी गुरुवारपासून (ता. 23) स्वतःच्या शेतातील विहिरीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्यातून शेकडो लोक, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते उपोषणस्थळी येऊन त्यांना पाठिंबा देत आहेत.

उस्मानाबादेतील ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी आज ढोणे यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. सरकारने अंत पाहू नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. खासदार संजय जाधव यांनीही त्यांच्या मागणीचे समर्थन करीत पाठिंबा दर्शविला. पाडव्याच्या मुहूर्तावर कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास मला मुख्यमंत्र्यांनी इच्छामरणाची परवानगी द्यावी, असे म्हणून ढोणे यांनी उपोषण सुरूच ठेवले.

प्रकृती ढासळली
वाढत्या तापमानामुळे उपोषणकर्ते तुकाराम ढोणे यांची प्रकृती आज आणखीन ढासळली असून त्यांचे वजन घटले आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण घटल्याने त्यांना अधूनमधून ग्लानी येत आहे.