कर्जमुक्तीसाठी पांगरातील शेतकऱ्याचे नदीत उपोषण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

जो पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत लढत राहणार. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गोदावरी नदीत उपोषण करण्याचे ठरवले. त्यामुळेच फळा येथे संत मोतीराम महाराजांच्या तिर्थ क्षेत्रात उपोषणाला सुरवात केली. या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा वाठत आहे.
- तुकाराम ढोणे, उपोषणार्थी

पालम  राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रविवारी (ता.२१) दुपारी दोन वाजता पांगरा (ता.पूर्णा) येथील शेतकरी तुकाराम सदाशिव ढोणे (वय ३५) हे फळा (ता.पालम) येथे गोदावरी नदीच्या काठावर राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांवरील कर्ज माफीच्या मागणीसाठी बेमुदत अमरण उपोषणाला बसले आहेत.

शेतकरी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी आवश्यक आहे. यासाठी पांगरा (ता.पूर्णा) येथील शेतकरी तुकाराम ढोणे यांनी फळा (ता.पालम) येथील गोदावरी नदीच्या काठावर नावेत (टोकऱ्यात) बसून अमरण उपोषणाला सुरवात केली आहे. याप्रकरणी त्यांनी पालम तहसीलदार यांना निवेदन देऊन निवेदनाद्वारे कर्जमाफीची मागणी केली आहे.

चार वर्षांपासून सततच्या पडत असलेला दुष्काळ, शेती व्यवसाय तोट्यात जात असल्यामूळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना निपिकीमूळे तसेच शेती मालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण व लग्न कार्य करणे पैशाअभावी अवघड झाले आहे. चालू अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी आदी मागण्या त्यांनी पालम तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केल्या आहेत. रविवारी सायंकाळी सहापर्यंत तहसील प्रशासन अथवा पोलिस प्रशासनाचे एकही अधिकारी कर्मचारी उपोषणस्थळी आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

ढोणे यांचे कर्जमाफीसाठी दुसऱ्यांदा उपोषण
तुकाराम ढोणे यांनी या अगोदर ता. २३ मार्च रोजी आपल्या स्वत:च्या पांगरा (ता.पालम) येथील शिवारातील तरंगल या कोरड्या विहीरीत अमरण उपोषण केले होते. त्यांच्या उपोषणाची चर्चा थेट विधिमंडळ अधिवेशनापर्यंत पोहचली होती. स्थानिक आमदार तसेच प्रशासनाच्या श्वासनानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. तरी अद्याप कर्जमाफीची घोषणा झाली नाही. परिणामी त्यांनी दुसऱ्यांदा पालम तालुक्यातील फळा येथे श्री संत मोतीराम महाराजांच्या देवस्थानाच्या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर नावेत (टोकऱ्यात) बसून उपोषण करीत आहेत. त्यामुळे त्यांची कर्जमाफीसाठी करीत असलेल्या उपोषणाची तालुक्यात चांगलीच चर्चा आहे. तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी त्यांची भेट घेऊन पाठिंबा देत आहेत.

जो पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत लढत राहणार. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गोदावरी नदीत उपोषण करण्याचे ठरवले. त्यामुळेच फळा येथे संत मोतीराम महाराजांच्या तिर्थ क्षेत्रात उपोषणाला सुरवात केली. या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा वाठत आहे.
- तुकाराम ढोणे, उपोषणार्थी