आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची अस्थिकलश दर्शन यात्रा

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

अस्थी गोळा करून ते पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाणार आहेत. त्यानंतर तेथून ते मुंबईला मंत्रालयावर जाणार आहेत. कर्जमाफी करावी, शेतमालावरील निर्यातबंदी उठवावी, डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्या श्री. जाधव यांच्या आहेत

लातूर - कर्जाला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांची ही व्यथा मांडण्याचा प्रयत्न साखराळे (जि. सांगली) येथील सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी सुरू केला आहे. राज्यभर ते फिरत आहेत. यात प्रत्येक जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन ते पुढे जात आहेत. त्यांची यात्रा मंगळवारी (ता. 9) येथे आली होती.

शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत. कर्ज फेडता येत नसल्याने तो आज आत्महत्या करीत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी साखराळे (जि. सांगली) येथील सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी एक यात्रा सुरू केली आहे. यात कोडोळी (जि. कोल्हापूर) येथील शेतकरी विलास शितापे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांची अस्थी घेऊन ते निघाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ते जात आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी ते गोळा करीत आहेत. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबादहून ते मंगळवारी लातूरमध्ये आले होते. अस्थी गोळा करून ते पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाणार आहेत. त्यानंतर तेथून ते मुंबईला मंत्रालयावर जाणार आहेत. कर्जमाफी करावी, शेतमालावरील निर्यातबंदी उठवावी, डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्या श्री. जाधव यांच्या आहेत.