मुलीच्या विनयभंगाबद्दल पित्याला सक्तमजुरी, दंड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

उस्मानाबाद - स्वतःच्याच मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्याला पाच वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) एस. ए. ए. आर. औटी यांनी बुधवारी (ता. 29) सुनावली. 

उस्मानाबाद - स्वतःच्याच मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्याला पाच वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) एस. ए. ए. आर. औटी यांनी बुधवारी (ता. 29) सुनावली. 

या संदर्भात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी दिलेली माहिती अशी ः जिल्ह्यात एक नोव्हेंबर 2016 ला घडलेले हे प्रकरण आहे. आई पाणी आणण्यासाठी बाहेर गेल्यावर मुली घरात खेळत होत्या. डोके दुखू लागल्यामुळे एक मुलगी घरात झोपली होती. त्या वेळी पिता मद्य प्राशन करून घरी आला आणि त्याने अन्य मुलींना घराबाहेर पाठवून एका मुलीचा विनयभंग केला. यासंदर्भात पत्नीने शिराढोण पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून सहायक पोलिस निरीक्षक एस. व्ही. मिरकले यांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) श्री. औटी यांच्यासमोर झाली. सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यामधील मुख्य साक्षीदार (फिर्यादी) व पीडित मुलगी फितूर झाल्या होत्या. मुख्य साक्षीदार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (कळंब), वैद्यकीय अधिकारी व अन्य साक्षीदारांची साक्ष व पुरावा, अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सूर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. औटी यांनी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.